If EVM is not hacked, win all the seats in the state - Prakash Ambedkar | ईव्हीएम हॅक न झाल्यास राज्यात सर्व जागा जिंकू - प्रकाश आंबेडकर
ईव्हीएम हॅक न झाल्यास राज्यात सर्व जागा जिंकू - प्रकाश आंबेडकर

मुंबई - देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत चर्चा सुरु आहे. एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र यावरुन विरोधकांनी ईव्हीएममध्ये गडबडी केल्याचा आरोप केल्याने देशातील वातावरण तापू लागलंय. जर ईव्हीएम हॅक झालं नाही तर राज्यात आम्ही सर्व जागा जिंकू असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी करत ईव्हीएम संशय उपस्थित केला आहे. 

पत्रकाराशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशभरात पुन्हा एनडीएला बहुमत मिळेल अशी शक्यता फार कमी आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचं नाही पण ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ईव्हीएममध्ये गडबड झाली नसेल तर भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी होतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच सोलापूर, अकोला, सांगली, वर्धा, नागपूर, नाशिक अशा विविध मतदारसंघात चांगली लढत झाली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला निश्चित यश मिळेल. मुस्लिम मतदारांनी युती-आघाडी दोघांनाही नाकारलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात अनेक जागा मिळतील असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखवले. यामध्ये बहुतांश एक्झिट पोलमधून देशातील जनता पुन्हा एकदा मोदींनाच पसंती देतेय असं पाहायला मिळत आहे. एनडीएला 300 च्या पुढे जागा मिळतील. काँग्रेस आणि विरोधी पक्षांना अपेक्षित असलेलं यश मिळणार नाही असा अंदाज व्यक्त केला आहे. 

टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर यांनी एकत्रित केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रातील जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये भाजपा-शिवसेना युतीला 34 जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलमधून महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 17 जागा शिवसेना, भाजपा 17 जागा, काँग्रेस 4 जागा तर राष्ट्रवादीला 9 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत तर इतर 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळताना दिसत आहेत. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 जागा, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला 2 जागा्ंवर समाधान मानावं लागलं होतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या 22 जागांवरुन 19 जागांवर घसरण होईल तर शिवसेनेच्या खासदारांची संख्याही कमी होईल. शिवसेना यंदाच्या निवडणुकीत 15 जागा जिंकेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 8 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी फॅक्टर राज्यात चालला नाही असं एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. 
 


Web Title: If EVM is not hacked, win all the seats in the state - Prakash Ambedkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.