कोर्ट उघडल्यास वकिलांना वाटतेय जीवाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:50 AM2020-06-05T04:50:16+5:302020-06-05T04:51:15+5:30

बोरीवली कोर्टाचे वकील : दीडशे ते दोनशे जणांचा समावेश

If the court opens, the lawyers will feel threatened | कोर्ट उघडल्यास वकिलांना वाटतेय जीवाची धास्ती

कोर्ट उघडल्यास वकिलांना वाटतेय जीवाची धास्ती

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :कोर्टाचे कामकाज येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र बोरीवली कोर्टात कोरोनापासून संरक्षणासाठी निर्जंतुकीकरणापासून कोणत्याच उपाययोजना करण्यात न आल्याने जीवाला धोका निर्माण होण्याची धास्ती वकिलांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोर्ट उशिरा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून रिमांड वगळता कोर्टात कोणत्याही प्रकरणाची सुनावणी न करता ती बंद ठेवण्यात आली आहे. मात्र येत्या ८ जून, २०२० पासून ती उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वकिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बोरीवली कोर्टातील वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी सुरुवातीला एक दिवस निर्जंतुकीकरण केले आणि बिसलेरी पाण्याची सोय करण्यात आली. मात्र त्यानंतर याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
कोर्टाच्या दहा बाय दहाच्या खोलीत खटले चालणार. त्यामुळे वकिलांसह कोर्टाचा स्टाफ, आरोपी, पक्षकार, त्याचे नातेवाईक आणि पोलीस अशी गर्दी त्या ठिकाणी होणार हे नक्की आहे.
सध्या पावसाळा असल्याने कोर्टाच्या परिसरात उभे राहणे लोकांना शक्य नसल्याने हे लोक दाटीवाटीने कोर्ट रूमजवळ उभे राहणार, यात फिजिकल डिस्टन्स ठेवणे अशक्य आहे. त्यातच वकिलांसाठी असलेली कोर्टातील स्वच्छतागृहे कोणीही वापरतो. त्याची स्वच्छता पीडब्लूडीकडून राखली जात नाही, त्यामुळे तिथूनही या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधल्या काही काळात आरोपी कोरोनाबाधित सापडले. त्याची माहिती वकिलांना उशिरा देण्यात आली, परिणामी त्यांच्या कुटुंबीयांचाही जीव धोक्यात आला. त्यामुळे याबाबत पुनर्विचार करण्यात यावा, असे वकिलांचे म्हणणे असून कोर्ट अजून काही महिने उशिराने उघडावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘बोरीवली कोर्टात अठरा पोलीस ठाण्याचे कामकाज चालते. यात कुरार, वनराई, आरे, दिंडोशी, दमूनगरसारख्या दाट वस्ती असलेल्या झोपडपट्टीचा समावेश आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती जर कोरोना संक्रमित निघाली तर त्यामुळे अनेकांच्या जीवाला नकळत धोका निर्माण होईल. कोर्टाच्या निव्वळ १५ टक्के स्टाफला हजर राहण्यास सांगण्यात आले, तर मग वकिलांच्या जीवाचे काय? आमची काळजी का नाही, कोर्टाचे कामकाज उशिरा सुरू करण्यात आले तरी फारसा फरक पडणार नाही, मात्र एखाद्याचा जीव गेला तर तो परत मिळवता येणार नाही.
- अ‍ॅड. दत्ता मांढरे, वकील, बोरीवली कोर्ट

Web Title: If the court opens, the lawyers will feel threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.