Join us  

देशात बायोलॉजिकलपेक्षा आयडॉलॉजिकल घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात बायोलॉजिकलपेक्षा आयडॉलॉजिकल घातक आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या आदरांजली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात बायोलॉजिकलपेक्षा आयडॉलॉजिकल घातक आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ऑनलाइन आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी केले होते.

ऑनलाइन आदरांजली कार्यक्रमात मल्लिका साराभाई, नंदिता दास, अरुणा रॉय, इंदिरा जयसिंग, डॉ. जयंती घोष, निखिल वागळे आदी विविध क्षेत्रांतील व राज्यांतील चाळीस मान्यवर सहभागी झाले होते. आजपासून पुढील पाच शुक्रवारी सायं. ६ वाजता हा उपक्रम चालू राहील. पुढील शुक्रवारी कोविडने बळी घेतलेल्या पत्रकार - माध्यमकर्मींना आदरांजली वाहिली जाईल. त्यात देशातील मान्यवर पत्रकार सहभागी होतील.

यावेळी नंदिता दास म्हणाल्या की, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक आहे. तसेच वैचारिक लढाईदेखील सुरू आहे. आपल्यापर्यंत खरी माहिती पोहचू दिली जात नाही. जे खरे बोलतात त्यांना वेगळे केले जात आहे. त्यामुळे कोरोनासोबतच आपल्या वैचारिक लढाईलादेखील सामोरे जायचे आहे. यातून बाहेर निघू तेव्हा आपले आयुष्य वेगळे असेल.

बाबा आढाव म्हणाले की, आपल्या देशातील राजकारण घाणेरडं आहे, कोरोनासारखे अनेक आजार आले त्यावर वैद्यकीय क्षेत्राने उपाय शोधले, कोरोनावर चांगला उपाय शोधला जाईल. पण सध्या जे राजकारण सुरू आहे ते वाईट आहे. गरिबाला काम मिळत नाही, दाम मिळत नाही. ५ किलो अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहेे; पण ते मिळते का, जर मिळत असेल तर त्याचा दर्जा चांगला आहे याकडे दुर्लक्ष होत आहे.

तर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणाले की, देशात झालेले मृत्यू हे कोरोनामुळे झालेले नाही तर त्या रुग्णांना वेळेत बेड, उपचार आणि व्हेंटिलेटर न मिळाल्याने झाले आहेत. बायोलॉजिकल कोरोनापेक्षा आयडॉलॉजिकल कोरोना वाईट आहे. आतापर्यंत वार्तांकन करताना पाहिलेल्या घटनांपैकी सर्वात वाईट स्थिती आता आहे. धर्मांधता पसरवली जात आहे, कोरोनाच्या नावाने नरसंहार सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. आता वैचारिक लढाई सुरू आहे; पण आपल्याला जर पुढे जायचे असेल तर आंबेडकर आणि गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाने जावे लागेल.

तर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, कोरोनाला धार्मिक स्वरूप दिले जात आहे ते चुकीचे आहे. आजही कितीतरी गरीब रुग्णांना बेड मिळत नाही; पण पैशावाल्यांना दिले जात आहे. या विरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.