Join us  

‘आयसीएआय’च्या अध्यक्षांच्या मुलीचा लोकलखाली येऊन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 5:59 AM

‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया’चे (आयसीएआय) अध्यक्ष निलेश विकमसी यांची मुलगी पल्लवी (२१) हिचा करी रोड-परळ स्थानकांदरम्यान लोकलखाली येऊन बुधवारी मृत्यू झाला.

मुंबई : ‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया’चे (आयसीएआय) अध्यक्ष निलेश विकमसी यांची मुलगी पल्लवी (२१) हिचा करी रोड-परळ स्थानकांदरम्यान लोकलखाली येऊन बुधवारी मृत्यू झाला. गुरुवारी तिच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला असून पल्लवीच्या मोबाइलवरून कुटुंबातील एकाला ‘नो वन इज रिस्पॉन्सिबल’ असा मेसेज आल्याचे उघड झाल्याने तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.परळच्या ‘कल्पतरू’ इमारतीत विकमसी कुटुंब राहते. चर्चगेटच्या एच. आर. कॉलेजमध्ये शिकणारी पल्लवी ‘ओअ‍ॅसिस काऊन्सिल अँड अडव्हायजरी’मध्ये इंटर्नशीप करीत होती. बुधवारी नेहमीप्रमाणे ती घराबाहेर पडली; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर सीएसएमटी स्थानकात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ती प्लॅटफॉर्म क्रमांक ५वर होती, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. अधिक तपासावेळी एमआरए मार्ग पोलिसांनी गुरुवारी दादर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला, असता बुधवारी सायंकाळी ६.४०च्या सुमारास करीरोड ते परळ दरम्यान एका तरुणीचा लोकलखाली मृत्यू झाल्याचे समजले. कुटुंबीयांना ओळख पटवण्यासाठी बोलविल्यावर तो मृतदेह पल्लवीचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावर मोबाइल अथवा पर्स सापडलेली नाही. ओळखपत्र, मोबाइल क्रमांकावरून ओळख पटते. मात्र दोन्ही नसल्याने ओळख पटण्यास उशीर झाला. तिने आत्महत्या केली की तोल गेल्याने खाली पडली? की कोणी ढकलले याचा तपास सुरू आहे.पल्लवी विकमसीच्या वडिलांनी कुणाविरुद्ध तक्रार दिलेली नाही, अशी माहिती दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली. तर ही आत्महत्या असल्याचा अंदाज असल्याचे ‘जीआरपी’चे पोलीस उपायुक्त समाधान पवार म्हणाले.

टॅग्स :मुंबईमुंबई उपनगरी रेल्वे