Join us  

मी ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार होणार आहे, याचा मला अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:06 AM

कॅ. आकांक्षा सोनावणे यांची प्रतिक्रियालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला असो वा पुरुष, मला ऐतिहासिक असा वैमानिक प्रवास ...

कॅ. आकांक्षा सोनावणे यांची प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिला असो वा पुरुष, मला ऐतिहासिक असा वैमानिक प्रवास करण्याची संधी मिळत असून हा प्रवास, ही घटना याची ऐतिहासिक नोंद होणार आहे, याचा मला आनंद आहे. अभिमान आहे. गर्व आहे. यासाठी मी नम्रदेखील आहे, अशी प्रतिक्रिया कॅ. आकांक्षा सोनावणे यांनी दिल्याचे आकांक्षा यांच्या आई प्रभा सोनावणे यांनी सांगितले.

एअर इंडियाच्या महिला विमानचालक विक्रम रचणार आहेत. त्या बोइंग-७७७ एसएफओ-बीएलआर या विमानातून उत्तर ध्रुवावरून उड्डाण करत जगातील सर्वात जास्त लांबीचा म्हणजे १६ हजार किमीचा सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू हवाई प्रवास करणार आहेत. या कामगिरीत मुंबईकर आकांक्षा सोनावणे या विमानचालकाचा समावेश आहे.

आकांक्षा यांचे आपल्या आई प्रभासह कुटुंबासोबत बोलणे होत आहे. वांद्रे येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. आईसोबत झालेल्या संवादात आकांक्षा म्हणाल्या की, मी ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होत असल्याने अभिमान, गर्व आहे. उत्तर ध्रुवावरून १६ हजार किलोमीटरचा प्रवास आहे. एअर इंडियाचा असा पहिलाच प्रवास आहे. मी खूप उत्साही आहे. कारण मी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे. मला याचा अभिमान आहे. गर्व आहे. ऐतिहासिक घटनेबाबत मी नम्र आहे. वैमानिकांना अशी संधी कधी मिळत नाही. मला ही संधी मिळाली आहे याचा आनंद आहे.

महिला वैमानिकांच्या टीमने उत्तर ध्रुवावरून उड्डाण करण्याची पहिलीच वेळ आहे. उत्तर ध्रुवावरून विमान उडवणे आव्हानात्मक असल्याने हवाई वाहतूक कंपन्या या मार्गाची जबाबदारी अनुभवी वैमानिकांकडे देतात. एअर इंडियाने ही जबाबदारी महिला कॅप्टनकडे दिली आहे. ९ जानेवारीला सॅन फ्रान्सिस्कोवरून उड्डाण केलेले हे विमान उत्तर ध्रुवाच्या वरून झेपावत बंगळुरूत ११ जानेवारी रोजी उतरेल. एअर इंडियाच्या वैमानिकांच्या टीमचे नेतृत्व कॅप्टन झोया अगरवाल या करत आहेत. झोया यांच्यासोबत कॅप्टन थनमई पापागरी, आकांक्षा सोनावणे, शिवानी मन्हास या महिला वैमानिक आहेत.