Join us  

झोपडीवासीयांना पाचशे चौरस फुटांची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 5:24 AM

फुंकले लोकसभेचे रणशिंग; मुंबईतील सभेत राहुल गांधी यांचे आश्वासन

मुंबई : काँग्रेस सत्तेत आल्यास पहिल्या दहा दिवसांत किमान वेतन हमी कायदा लागू करू आणि मुंबईतील झोपडीवासीयांना पाचशे चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर सभेत दिले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या गांधी यांनी वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर केलेल्या भाषणाच्या सुरुवातीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आणि विंग कमांडर अभिनंदन वर्र्धमान भारतात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यानंतरच्या तडाखेबंद भाषणात ते म्हणाले, मोदी जेथे जातात तेथे मोठमोठी भाषणे ठोकतात. शेतकऱ्यांना कर्जमाफी, दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाखांचे आश्वासन त्यांनी दिले. त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

एका शेतकºयाला दिवसाला साडेतीन रुपये देणाºया मोदींनी एकट्या अनिल अंबानीला ४० हजार कोटींचे कर्ज दिले. पुढे राफेल करारात एचएएलचे तीस हजार कोटी अंबानींच्या घशात घातले. या चोरांना कोट्यवधी देताना भाजपा खासदारांनी टाळ्या का नाही वाजवल्या, असा सवालही राहुल यांनी केला. बाके वाजवा नाही तर मोदी मारतील, या भीतीपोटी त्यांचे खासदार बाके वाजवत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मोदींनी पाच वर्षांत पंधरा बड्या उद्योजकांची साडेतीन लाख कोटींची कर्जे माफ केली. मात्र, सामान्य व्यापारी, धारावीतील छोटे उद्योजक, व्यावसायिक, शैक्षणिक कर्ज घेणाºया सामान्य युवक-युवतींची कर्जे माफ केली नाहीत. मोदींचा सारा कारभार निवडक उद्योजकांच्या भल्यासाठी आहे. बड्या उद्योजकांचा भारत आणि सामान्य माणसांचा भारत अशी विभागणीच त्यांनी केल्याचा आरोपही गांधी यांनी केला.एमएमआरडीए मैदानावरील या जंगी सभेला मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, संजय निरुपम, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, मिलिंद देवरा, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे आदी नेते उपस्थित होते.‘काम की बात’मन की बात ऐकायचे असेल तर मोदींच्या सभेला जा आणि काम की बात करायची असेल तर काँग्रेसकडे या, असे सांगताना काँग्रेस खोटी आश्वासने देत नाही. दिलेला शब्द पाळते, असा टोला लगावत आगामी निवडणूक ही विचारधारेची लढाई असल्याचा दावाही त्यांनी केला.स्मार्ट सिटी कुठे?मोदींनी सत्तेत आल्यानंतर शंभर शहरे स्मार्ट बनविण्याची घोषणा केली. पण, कुठे आहेत स्मार्ट सिटी, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. मुंबई ही जगातील सर्वात मोठी स्मार्ट सिटी आहे. मुंबई देशाचे इंजीन आहे. देशाचे हृदय आहे. या मुंबईच्या शक्तीला समजून घ्यावे लागेल, असेही राहुल म्हणाले.

टॅग्स :राहुल गांधी