Join us  

कांदिवलीतून दीड कोटीचा मांडूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:43 AM

मांडूळ घरात ठेवल्याने आणि पूजा केल्याने आर्थिक वृद्धी होत असल्याच्या अंधश्रद्धेतून कोट्यवधी रुपयांसाठी होत असलेल्या तस्करीचा कांदिवली पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला.

मुंबई : मांडूळ घरात ठेवल्याने आणि पूजा केल्याने आर्थिक वृद्धी होत असल्याच्या अंधश्रद्धेतून कोट्यवधी रुपयांसाठी होत असलेल्या तस्करीचा कांदिवली पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोन तस्करांना रंगेहाथ अटक केली असून त्यांनी असा प्रकार याआधीही केलाय का, याबाबत चौकशी सुरू आहे. सुनील माने (२५) आणि संतोष अहिरे ( ३०) अशी अटक तस्करांची नावे आहेत.महावीरनगर परिसरात मांडूळ या दुर्मीळ सर्पाची विक्री करण्यासाठी काही तस्कर येणार असल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विलास कदम, पोलीस उपनिरीक्षक दीपक हिंडे, वैभव ओवर आणि पथकाने कांदिवलीच्या महावीरनगर पोलीस चौकीमागे असलेल्या मैदानात सापळा रचला.त्या वेळी माने आणि अहिरे त्यांना संशयास्पदरीत्या वावरताना दिसले. त्यानुसार अडाणे यांच्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत एक मांडूळ त्यांना सापडला. या मांडूळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत १ कोटी ६० लाख रुपये आहे. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. माने हा भांडुप तर अहिरे हा गोरेगावचा रहिवासी आहे.या दोघांनी हा मांडूळ कोठून व कसा आणला, तो कोणाला विकणार होते, याबाबत सध्या पोलीस चौकशी करीत आहेत. दरम्यान, मांडूळाला वन विभागाच्या ताब्यात देणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.>आदेश मिळाल्यावर जंगलात सोडणार!मांडूळ सर्प तस्करीची संपूर्ण कारवाई स्थानिक पोलिसांकडून करण्यात आली आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीमध्ये असून पुढील तपास सुरू आहे. हा मांडूळ जातीचा सर्प असून शेड्युल ४ मध्ये त्याचा समावेश आहे. पोलीस तपासणी झाल्यावर न्यायालयाकडून मांडूळ सर्पाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश मिळाल्यावर वनविभाग मांडुळाला ताब्यात घेईल आणि त्याची जंगलात सुटका केली जाईल.- संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी (मुंबई)