Join us

सायन रुग्णालयात आजपासून बायोटेक लसीची मानवी चाचणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय बायोटेक लसीच्या मानवी चाचणीसाठी पालिकेच्या सायन रुग्णालयाची नियुक्ती करण्यात आली. या लसीच्या मानवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय बायोटेक लसीच्या मानवी चाचणीसाठी पालिकेच्या सायन रुग्णालयाची नियुक्ती करण्यात आली. या लसीच्या मानवी चाचणीत सहभागी होण्यासाठी जवळपास ३००हून अधिक जणांनी सायन रुग्णालय प्रशासनाकडे नोंदणी केली आहे. आता लसीची चाचणी सुरू करण्यासाठी एथिकल कमिटीकडून रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे, त्यामुळे मंगळवारपासून येथे चाचणी सुरू होणार आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)च्या मदतीने विकसित केलेल्या देशी लसींच्या चाचणीसाठी भारत बायोटेकने पालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड केली आहे. देशभरातील २५ केंद्रांमध्ये २६ हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, सुरुवातीच्या टप्प्यात २००- ३०० व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यानंतर त्याचे परीक्षण करून चाचणीबाबत पुढील दिशा ठरविण्यात येईल. सायन रुग्णालयात लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार आहे.

* आरोग्य कर्मचाऱ्यांचा पाच टक्के सहभाग

सायन रुग्णालय आणि वैद्यकीय कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, ही फेज-३ चाचणी असल्याने हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर ही चाचणी करावी लागेल. आतापर्यंत ३०० लोक लस घेण्यास उत्सुक आहेत. चाचणीसाठी एकूण स्वयंसेवकांपैकी २० टक्के सहभाग अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींचा असेल. या आजारांत हृदयविकार, मूत्रपिंड, यकृतविकार व अन्य आजारांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे पाच टक्के सहभाग हा आरोग्य कर्मचाऱ्यांचा असेल.