प्रभादेवी पूल पाडकामासाठी १५ तास ब्लॉक कसा घ्यावा? 'मध्य'ला प्रश्नः ४० एक्सप्रेस १२५० लोकलवर प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:32 IST2025-12-02T09:26:07+5:302025-12-02T09:32:51+5:30
महारेलकडून पुलाच्या पाडकामासाठी १४ तासांचा ब्लॉक मागितला असून रेल्वेला ओव्हरहेड वायरच्या कामासाठी सुमारे १ तास हवा आहे. या कालावधीत दादर - सीएसएमटी मार्ग बंद केल्यास रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.

प्रभादेवी पूल पाडकामासाठी १५ तास ब्लॉक कसा घ्यावा? 'मध्य'ला प्रश्नः ४० एक्सप्रेस १२५० लोकलवर प्रभाव
मुंबई : प्रभादेवी रेल्वे पूल पाडण्यासाठी आवश्यक रेल्वे ब्लॉकचे नियोजन करताना मध्य रेल्वेची दमछाक होत आहे. कारण महारेलकडून पुलाच्या पाडकामासाठी १४ तासांचा ब्लॉक मागितला असून रेल्वेला ओव्हरहेड वायरच्या कामासाठी सुमारे १ तास हवा आहे. या कालावधीत दादर - सीएसएमटी मार्ग बंद केल्यास रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार असल्याने १५ तासांचा ब्लॉक कसा घ्यायचा असा प्रश्न आता मध्य रेल्वेला पडला आहे.
प्रभादेवी रेल्वे पुलाचे पाडकाम आणि बांधकाम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एमआरआयडीसी) माध्यमातून करण्यात येणार आहे. रेल्वे भागातील १३२ मीटर पुलाचा भाग मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रेल्वे रुळांवरून जातो. असे असले तरी दोन्ही भागातले पाडकाम मात्र स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. सुरुवातीला मध्य रेल्वे भागातले पाडकाम करण्यात येणार असून यासाठी ब्लॉकचे नियोजन सुरू आहे. या पुलाचे गर्डर आणि ओव्हर हेड वायर यांच्यातील अंतर खूप कमी असल्याने संपूर्ण मार्गाची वीज बंद करावी लागणार आहे.
वेळापत्रक कोलमडणार?
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर दरम्यान चारही मार्गिका बंद केल्यास सुमारे ४० मेल/एक्सप्रेस आणि १२५० लोकल सेवांवर परिणाम होईल.
बाहेरगावाहून येणाऱ्या 3 रेल्वेगाड्यांना दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर (एलटीटी) मध्ये सामावण्याची क्षमता नाही.
एक मार्ग बंद करण्याच्या पर्यायाचा विचार
कर्नाक बंदर पुलाच्या पाडकामासाठी ब्लॉक वेळी सीएसएमटी- मस्जिद दरम्यानची वाहतूक बंद केली होती. या कालावधीत एक्सप्रेस ट्रेन दादरसह वाडीबंदर यार्डमध्ये शॉर्ट टर्मिनेट केल्या होत्या. परंतु प्रभादेवी पुलाच्या ब्लॉक कालावधीत ट्रेन तिथपर्यंत पोहोचणार नसल्याने कॅन्सलेशन टाळता येत नाही. त्यासाठी चारही मार्ग एकाच वेळेस बंद करण्याऐवजी एक-एक मार्ग बंद करता येईल का याचा विचार सुरू आहे.