Join us  

खार व उत्तरप्रदेश पोलिसांमध्ये गरमागरमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:05 AM

वेबसिरीज ‘मिर्झापूर’ चौकशी विवाद : अफवा असल्याचे मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमेझॉन प्राईम या ओटीटी ...

वेबसिरीज ‘मिर्झापूर’ चौकशी विवाद : अफवा असल्याचे मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमेझॉन प्राईम या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजच्या चौकशीसाठी आलेल्या उत्तर प्रदेश पोलीस पथकाची मुंबईच्या खार पोलिसांसोबत बाचाबाची झाली. शुक्रवारी सकाळी गायक फरहान अख्तर यांच्या घरासमोर हा प्रकार घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र यात तथ्य नसून या निव्वळ अफवा असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

मिर्झापूर पोलीस शुक्रवारी अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या कार्यालयात गेले. मात्र त्याठिकाणी त्यांना कोणीही सापडले नाही. त्यामुळे त्यांनी नंतर खार गाठत फरहान अख्तर यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केले. मात्र याची माहिती वेळीच खार पोलिसांना मिळाली आणि त्यांनी तातडीने धाव घेत अख्तरच्या घरात शिरण्यास मिर्झापूर पोलीस पथकाला मज्जाव केला. तसेच कायद्याचे पालन करण्याची विनंती त्यांना केली. त्यामुळे दोन्ही पथकांमध्ये गरमागरमी सुरू झाली आणि मिर्झापूर पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला असे सूत्रांचे म्हणणे आहे.

असे काही घडलेच नाही

मात्र या पोस्ट सोशल मीडियातून पसरविल्या जात आहेत. असा कोणताच प्रकार घडलेला या निव्वळ अफवा असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्य एस यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण

धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशात मिर्झापूर या वेब सिरीजच्या निर्मात्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश वरून मिर्झापूर पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले. कायदेशीर प्रक्रियेनुसार या चौकशीसाठी त्यांना नोडल अधिकाऱ्याची परवानगी मिळविणे आवश्यक असते. त्यामुळे क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्याकडून तपासाची परवानगी मागण्यासाठी त्यांनी दोन दिवस खेपा घातल्या. मात्र ते उपस्थित नसल्याने त्यांना ती परवानगी मिळाली नाही.