Join us  

गुरांच्या कोंडवाड्यात घोड्यांचे हाल; डोळ्यांतून रक्तस्त्राव, अंगावरही जखमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 5:45 AM

दोन आठवड्यांपासून अडकवून ठेवलेल्या घोड्यांच्या डोळ्यांतून रक्तस्त्राव सुरू झाला असून, अंगावर जखमा झाल्या आहेत, तसेच खाण्या-पिण्याचे हाल आणि औषधोपचारांची सोय नसल्याने, १५ घोडे मरणपंथाला टेकले आहेत.

- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : दोन आठवड्यांपासून अडकवून ठेवलेल्या घोड्यांच्या डोळ्यांतून रक्तस्त्राव सुरू झाला असून, अंगावर जखमा झाल्या आहेत, तसेच खाण्या-पिण्याचे हाल आणि औषधोपचारांची सोय नसल्याने, १५ घोडे मरणपंथाला टेकले आहेत. ही मालाडमधील ‘गुरांचा कोंडवाडा’ विभागातील परिस्थिती आहे. घोड्यांच्या या स्थितीला कायद्याची माहिती उपलब्ध नसलेले, कोंडवाडा विभागाचे अधिकारी जबाबदार असाल्याचा आरोप आता होत आहे.दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवरून ४ एप्रिल रोजी कोंडवाडा विभागाने ८ घोडे पकडले. नंतर हे घोडे कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले, तसेच जुहू परिसरातूनही ४ घोडे ताब्यात घेण्यात आले, तेव्हापासून हे घोडे कोंडवाड्यातच आहेत. कोंडवाडा नियमानुसार, पकडण्यात आलेले कोणतेही जनावर वेळीच योग्य ती दंडात्मक कारवाई करून, नंतर त्यांच्या मालकाकडे सोपविण्यात यायला हवे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोंडवाड्यात असलेल्या अधिकाऱ्यांना या प्रक्रियेची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे घोड्यांच्या मालकाला या विभागाकडे रोज हेलपाटे मारावे लागत असून घोड्यांचेही हाल होत आहेत.एका घोडे मालकाने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, चणे हे घोड्याचे मुख्य अन्न आहे. मात्र, कोंडवाड्यात त्यांना कोरडा चारा दिला जातो. घोडे तो खात नसल्याने त्यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. त्यांच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होत आहे. तरीही मालकांना घोडे देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत.‘मी माझ्या घोड्यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळतो. कोंडवाड्यात त्यांच्यासाठी रोज चणे घेऊन जातो. गेले दहा दिवस तरी मी हेच करत आहे. मात्र, अधिकाºयांना विनंती करूनही घोड्यांना सोडून देण्यात ते टाळाटाळ करत आहेत,’ असे घोड्यांच्या मालकाने सांगितले. ‘आमच्याकडून जो काही दंड आकारायचा असेल तो आकारावा, पण घोड्यांचे हाल करू नयेत,’ असेही त्यांनी नमूद केले.उन्हामुळे हाल-बेहालऊन घोड्यांसाठी फार मारक असते. उन्हाळ्यात त्यांची विशिष्ट प्रकारे काळजी घ्यावी लागते. त्यांना रोज अंघोळ घालावी लागते.कोंडवाड्यात कडक उन्हात घोडे उभे असतात आणि त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, तसेच त्यांना जखम होऊ न देणे हेदेखील गरजेचे आहे. मात्र, कोंडवाड्यामध्ये गेलेल्या घोड्यांच्या अंगावर जखमा झाल्या आहेत.या ठिकाणी डॉक्टरही उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकत नाहीत, असा आरोप घोड्याच्या मालकांनी केला आहे.‘महाराष्ट्र शासनाच्या नियमात काही बदल झाले आहेत. त्यानुसार, चर्चा सुरू होती. कोंडवाड्यात असा काही प्रकार घडलेला नाही आणि आम्ही एक-दोन दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घोड्यांना सोडून देणार आहोत.- दिलीप करंजकर,गुरांचा कोंडवाडा, अधिकारी.‘मी रोज रिक्षाने घोड्यांसाठी त्यांचे खाणे घेऊन मालाडला जातो. गेल्या दोन आठवड्यांपासून माझा हा नित्यक्रम आहे. घोड्यांना मुक्त करण्यासाठी कोंडवाडा अधिकारी निव्वळ तारखा देत आहेत. मात्र, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया त्यांनी अद्याप पूर्ण न केल्याने, त्या मुक्या प्राण्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.- घोड्यांचा मालक

टॅग्स :मुंबई