टॉप्स ग्रुपच्या अधिकाऱ्यांचा आरोप
\Sराहुल नंदा यांची भारतातील पैशांतून लंडनमध्ये घरासह गुंतवणूक
कंपनीच्या नावातही तीनदा बदल : टॉप्स ग्रुपच्या अधिकाऱ्यांचा आरोप
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या राहुल नंदा यांनी एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षकाच्या घोटाळ्याबरोबरच निव्वळ कागदोपत्री मालमत्ता वाढवून मालमत्तेच्या चौपट पैसे परदेशात गुंतवले. यातूनच लंडनमध्ये घर घेऊन तेथील द शील्ड गार्डिंगमध्ये ५१ टक्के समभाग घेतल्याचा आरोप टॉप्स ग्रुपच्या तक्रारदार अधिकाऱ्यांनी केला.
टॉप्स ग्रुपचे रमेश अय्यर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २००८ मध्ये टॉप्स कंपनीने लंडनच्या द शील्ड गार्डिंग कंपनीमध्ये १३० कोटी रुपयांचे ५१ टक्के समभाग घेतल्याचे समोर आले. २०१२ पासून ही कंपनी नंदाच सांभाळत होते. कागदोपत्री मालमत्ता वाढवून त्यांनी पैसे परदेशात पाठवले, यात आयसीआयसीआय बँक व्हेन्चर लिमिटेड आणि एव्हरस्टोन कॅपिटल यांना माहिती असूनही त्यांनी यात गुंतवणूक केली. पुढे द शील्ड कंपनी बेकायदेशीर व्यवहारामुळे लिक्विडेशनमध्ये गेली. त्यामुळे टॉप्स कंपनीने गुंतविलेल्या रकमेचे नुकसान झाले. तसेच भारतातील पैसा लंडन येथील कंपन्यांमध्ये गुंतवून त्यामधून कर्जाद्वारे मालमत्ता संपादन केली. आयकर विभागालाही त्यांनी अंधारात ठेवले.
पुढे नंदा यांनी चिप केअर एलएलपी नावाने नवीन व्यवसाय सुरू केला. २०१७ ते २०१९ दरम्यान तब्बल २५ कोटी रुपये टॉप्स ग्रुप कंपनीतून चिप कंपनीत पाठविले. ही रक्कम कंपनीला कर्ज म्हणून दाखवली. याबाबत संचालक आणि शेअरधारकांनाही अंधारात ठेवले. त्यानंतर चिप कंपनीचा तोटा दाखवून कंपनी बंद केली. टॉप्स ग्रुपला पैसे परत दिले नाहीत, असेही तक्रारीत नमूद आहे.
* आराेप फेटाळले
२०१७ मध्ये नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी टॉप्स कंपनीत त्यांचे ६६ टक्के समभाग मॉरिशस येथील नंदा फॅमिली नावाच्या ट्रस्टमध्ये ट्रान्सफर केले.
ईडीने नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध फेमा कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली. त्यानंतर कंपनीचे संचालक नसतानाही २०१६ पासून त्यांनी ८ कोटी रुपये कंपनीतून घेतले, असा आराेप आहे. ईडी या प्रकरणी अधिक चौकशी करीत असून नंदा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले.
....