Join us  

लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या महापुरुषांचा वारसा घेऊन इतिहास निर्माण करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 2:19 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। दोन्ही महापुरुषांची अध्यासन केंद्रे मुंबई विद्यापीठात सुरू होणार

मुंबई : येत्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या दोन्ही महापुरुषांच्या नावे मुंबई विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू केले जाणार आहे. या दोन महापुरुषांच्या नावे ही अध्यासन केंद्रे चालू केली जात आहेत, ही चांगली बाब असून यांचा समर्थ वारसा घेऊन पुढचा इतिहास आपण निर्माण केला पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिशताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम आॅनलाइन आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे  उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिशताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक योगायोग आहे. हेदोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.या दोन्ही महापुरुषांकडे मत-हिंमत आणि किंमत होती. स्वत:चे मत होते आणि ते मत मांडण्याची हिंमत त्यांच्यात होती आणि त्याही पलीकडे जाऊन  होणारे परिणाम आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत हे सगळे पचविण्याची ताकद त्यांच्यात होती. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यांनी आपले परखड मत मांडले. निवडणूक-सत्ता-अधिकार नसताना देशाचे नेतृत्व करणे सोपे नव्हते, त्याकाळी जनजागृतीसाठी मीडियासारखे माध्यम नसताना जनतेला जागे करण्याचे कार्य त्यांनी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिशताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त शासन आणि विद्यापीठ स्तरावर पुढे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. अध्यासनांची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य केले जाणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने समिती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चरित्र साधने समितीचा शासन निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  तसेच लोकमान्य टिळक यांच्या नावे रत्नागिरी येथे स्मारक आणि ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन्ही ऐतिहासिक वास्तूला शासनाने निधी उपलब्धकरून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.वर्षभर होणार कार्यक्रमलोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिशताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त शासन आणि विद्यापीठ स्तरावर पुढे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.अध्यासनांची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य केले जाणार असल्याचेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई