मुंबई : मासेमारी जहाज हायजॅक केल्याचा कॉल येताच भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिशुल आणि सुमेधा या दोन युध्द नौकांनी अँटी पायरेसी ऑपरेशन राबवत ९ सोमालियन समुद्री चाचे यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत २३ पाकिस्तानी मच्छिमारांची सुखरूप सुटका करण्यासही यश आले आहे. याप्रकरणी येलोगेट पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्चच्या रात्री अकराच्या सुमारास भारतीय नौदलाला अरबी समुद्र सागरी सीमेपासून १०५ नॉटिकल मैल सोमालियाच्या कोस्ट हद्दीत इरानियन फ्लॅग असलेले एआय कम्बर नावाचे मासेमारी जहाज सोमालियन चाच्यांची हायजॅक केल्याची माहिती मिळाली. त्यांनतर नौदलाच्या आयएनएस त्रिशुल आणि सुमेधा या दोन युध्द नौकांनी अँटी पायरेसी ऑपरेशन राबवले.
पाकिस्तानी मच्छिमारी जहाजाला ढाल बनवून सोमालियन चाचे नौदलासमोर शरण येत नव्हते. सोमालियन चाच्यांकडे एके ४७ रायफल, हॅन्डग्रेनेड व रॉकेट लॉन्चर होते. मात्र, भारतीय नौदलाने त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पडताच सोमालियन चाच्यांची त्यांची काही शस्त्रे पाण्यात टाकली. त्यानंतर, भारतीय नौदलाने नऊ समुद्री चाच्यांना ताब्यात घेत २३ पाकिस्तानी मच्छिमारांची सुखरूप सुटका केली आहे.
भारतीय नौदलाने या कारवाईत एके ४७ रायफलची ७२८ जिवंत काडतुसे, जीपीएस डिव्हाईस, आठ मोबाईल फोन असे साहित्य जप्त केले. भारतीय नौदलाने नऊ सोमालियन चाच्यांना यलोगेट पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. जेली जामा फराह (५०) अहमद बाशीर ओमर (४२), अबदीकरीन मोहम्मद शिरे (३४), अदन हसन वारमसे (४४), मोहम्मद अब्दी अहमद (३४), अबदीकादिर मोहम्मद अली (२८), अयोदीद मोहम्मद जिमाले (३०), सईद यासीन अदान (२५) आणि जमा सईद एल्मी (१८) अशी अटक करण्यात आलेल्या सोमालियन चाच्यांची नावे आहेत. गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी सांगितले. त्यानुसार, त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.