Join us

महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:32 IST

लघुकथा : नागोराव अन् बाजीराव सख्खे भाऊ. बाप मेला. घरात बाया-बायांची कुरबूर होत होती. दोघं भाऊ वेगळे झाले. नागोराव लई बेरकी. त्याच्या नसान्सात राजकारण. चाळीस एकरातील साखरपट्टीची वीस एकर नागोरावनं वाटून घेतली. बाजीरावला खरबाडी दिली. ते माळरान होतं. नागोराव पुढं कोणाची बोलायची हिंमत नव्हती. वाटणी करताना दोन बहिणी आल्या होत्या. छोटी सखूबाई गच्च मुकी होती. मोठी बहीण कांताबाई भीत भीत म्हणाली, ‘दादा तू साखरपट्टीतली पाच एकर तरी बाजीरावला दे. साखरपट्टीत केळी, ऊस, हळद पिकते. तुला देवा धर्मा हिर हाये. त्याला तर सगळं माळरान.’ त्यावर पटकन नागोराव म्हणाला, ‘बाई गुनान दोन घास खाय. अन् तू जाय बरं तुह्या घरी. वाटणी झाली आता काही बदल होणार नाही.’ दोघी बहिणी सासरी गेल्या.

- महेश मोरे

बाजीराववर अन्याय झाला. ही गावभर चर्चा होऊ लागली. एका दिवशी चौकात नागोराव उभा होता. पुढून सखाआज्या आला. डोळ्यावरचा चष्मा नीट करत म्हणाला, ‘बाब्या, नागोराव मला काही तुव्हं पटलं न्हाई. वाटणी काही बराबर झाली नाही.’ नागोराव रागातच म्हणाला, ‘राहू द्या माहीत हाये. सगळा गाव बिघडून टाकला. घर न् घर फुकून देलं... लई पुळका यायला.’ काठी टेकत-टेकत सखाआज्या निघून गेला. नागोरावला गावात माणसं चो-चो करू लागले. माघारी त्याला सगळेजण बोलू लागले. बाजीरावच्या जिवावर दोन पोरी उजून घेतल्या. दोन्ही पोरं पुण्यात शिकायलेत. नागोरावनं बराबर डाव साधवला होता. भावाभावाचं आता कसंच जमत नव्हतं. सख्खे भाऊ पक्के वैरी झाले होते. बाजीराव ज्याला त्याला सांगू लागला. गावाला बाजीरावची दैना पाहवत नव्हती. बाजीरावला वाळवी लागल्यागत झालं.

बाजीराव त्या खरबाडात मूग, उडीद, सोयाबीन घेऊ लागला. पाऊस नाही पडला की पीक वाळून जाऊ लागलं. बाजीरावला दोन पोरी एक मुलगा. मोठी पोरगी वंदना लग्नाला आलेली. छोटी अनिता मोठीहून दीड वर्षानं लहान होती. बाजीरावला वाटू लागलं दोघीचं एकदाच उरकून टाकावं. पणिक जवळ पैसा नव्हता. मुलगा दहावीला शिकत होता. नांदेड शहरात शिकायला ठेवायला बाजीरावजवळ पैसा नव्हता. बाजीरावचं गाव लई मोठ्ठ. गावातच आता कॉलेज आलं. गावाला आता तालुक्याचा दर्जा मिळाला होता. कधी नाही ते नागोरावची बायको महानंदा शेताकड जाऊ लागली. वेगळं निघा अन् संसार बघा असं झालं होतं. बाजीरावची बायको अनुसयाला मातर सगळीच शेतीची काम करायची सवय होती. बाजीराव अन् अनुसया रातंदिस मेहनत करीत होते. पणिक खरबाडात काहीच पिकत नव्हतं. नागोरावनं पाच एकर जमीन विकत घेतली. सावडून ठेवलेल्या पुटकोळ्याचा बराबर फायदा घेतला होता.

नागोरावला आता पंचवीस एकर जमीन झाली होती. बाजीराव एक दोन वेळा म्हणाला, ‘दादा वाटणी बराबर झाली नाही’ तव्हा बाजीरावला झोडपून काढलं होतं. धट खाई मीठ अन् गरीब खाई गचाट्या अशी गत बाजीरावची झाली होती. गावाला तालुक्याचा दर्जा मिळाल्याने नकाशाच बदलला होता. गावाजवळून नवा महामार्ग चालला होता. गाव तालुक्याचे ठिकाण झाल्याने गावाबाहेर बसस्टँड होणार होते. आता महामार्ग बाजीरावच्या शेतातून गेलेला. नवीन बसस्टँडसाठी बाजीरावची जमीन सरकारने घेतली. सर्व जमिनीचं मोजमाप झालं होतं. सरकारने बाजीरावच्या खात्यावर पन्नास लाख टाकले होते. पुढे करोडो रुपये जमा होणार होते.

नागोरावनं एकाएकी बैठक बोलावली. कांताबाईला कार करून जाऊन आणलं. सखूबाई आली होती. बाजीरावला बैठकीला बोलावलं. नागोरावच्या मेळणीतली चार माणसं बोलावली. नागोराव तावातावाने बोलू लागला, ‘बसस्टँडची जमीन मला दे. नाही तर तुला जेवढे पैसे येतील त्यात चार हिस्से होतील. पहिला मव्हा दोन हिस्से बहिणीचे, चौथा तुहा’ बाजीराव गरम झालेला. त्यानं पटकन म्हणाला, ‘एक रुपया देणार नाही. वायलं निघून पंधरा साल झाली. तव्हा पाच एकर साखरपट्टीतली जमीन दिली नाही. कांताबाईला तुच म्हणला व्हतास की, आता वाटणीत बदल होणार नाही. हे तुहेच शब्द हायेत.’ नागोरावनं भांडण कोर्टात नेलं... महामार्गामुळे नवीनच कवंडळ लागली होती.( maheshmore1969@gmail.com )