Join us

जेएनपीटीसाठी उच्चस्तरीय समिती

By admin | Updated: March 4, 2015 02:32 IST

जेएनपीटीच्या नियोजित विस्तारामुळे भविष्यात या क्षेत्रातील मूलभूत सुविधांवर ताण पडण्याची शक्यता आहे

नवी मुंबई : जेएनपीटीच्या नियोजित विस्तारामुळे भविष्यात या क्षेत्रातील मूलभूत सुविधांवर ताण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जेएनपीटी प्रभावक्षेत्राच्या समतोल विकासासाठी उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून या क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवले जाणार आहेत, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिली.जेएनपीटी बंदरामुळे या परिसरात अनेक नागरी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. वाहतुकीची कोंडी आणि रस्ते अपघाताची समस्या गंभीर बनली आहे. भविष्यात या बंदराचा आणखी विस्तार होणार आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जेएनपीटी प्रभाव क्षेत्राच्या सुनियोजित विकासावर चर्चा करण्यासाठी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये दोन दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आज या कार्यशाळेचा समारोप झाला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाटिया यांनी ही माहिती दिली.खोपटा, नयना आणि नवी मुंबई शहराच्या काही भागांसह १६० चौरस किलोमीटरचा परिसर जेएनपीटीच्या प्रभाव क्षेत्रात मोडतो. त्यामुळे भविष्यात या परिसरात निर्माण होणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाच्या सहभागाने एक उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार या कमिटीत जेएनपीटीसह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बीपीसीएल, ओएनजीसी, जिल्हाधिकारी, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांचा समावेश असणार आहे. जेएनपीटी प्रभाव क्षेत्राचा सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी पोर्ट सिटीची संकल्पना राबविण्याचा विचार असल्याची माहिती भाटिया यांनी दिली. या भागातील गावे दत्तक घेऊन त्यांना आदर्श गावांचा दर्जा देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने त्यांना रोजगारात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोर्टमधील उपलब्ध नोकऱ्यांच्या अनुषंगाने त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना असल्याची माहिती भाटिया यांनी दिली. या कामाला गती देण्यासाठी सिडकोत जेएनपीटी प्रभाव क्षेत्र या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आल्याचे भाटिया यांनी सांगितले. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष नीरज बन्सल, सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)