Join us  

अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:04 AM

परमवीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेशपरमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे ...

परमवीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश

परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले. प्राथमिक चौकशीनंतर पुढे काय कार्यवाही करावी, याबाबत सीबीआयच्या संचालकांनी निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमल्याने सीबीआयने गुन्हा दाखल करण्याची घाई करू नये, असे मुख्य न्या. दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करावी, या मागणीसाठी व्यवसायाने वकील असलेल्या जयश्री पाटील, घनश्याम उपाध्याय, व्यवसायाने शिक्षक असलेले मोहन भिडे यांनी तर खुद्द परमबीर सिंग यांनी २५ मार्च राेजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्व याचिकांवरील निकाल उच्च न्यायालयाने ३१ मार्च रोजी राखून ठेवला होता.

सोमवारी न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्या. ‘याचिका दाखल करून घ्यायच्या की नाही, यामध्ये आम्हाला जायचे नाही. उच्चस्तरीय चौकशी करण्यासंबंधी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे आम्हाला वाटते,’ असे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयापुढे हे अभूतपूर्व प्रकरण आहे. देशमुख हे गृहमंत्री आहेत आणि ते पोलिसांचे नेतृत्व करतात. त्यामुळे स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. तथापि, सीबीआयला तत्काळ गुन्हा दाखल करण्याची किंवा पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेणे आवश्यक नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

..........................................