Join us  

एआयबी सदस्यांना हायकोर्टाचा दिलासा

By admin | Published: February 17, 2015 2:24 AM

अश्लील शेरेबाजीने चर्चेत असलेल्या एआयबी सदस्यांवर कठोर कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांना दिले.

मुंबई : अश्लील शेरेबाजीने चर्चेत असलेल्या एआयबी सदस्यांवर कठोर कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांना दिले. मात्र, याचा तपास सुरू ठेवण्याची मुभा न्यायालयाने पोलिसांना दिली आहे.या प्रकरणी पुणे पोलीस ठाण्यात नोंद असलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका एआयबीने दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत या सदस्यांवर कठोर कारवाई करू नका, असे आदेश देत न्या. रणजीत मोरे यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे निर्देशही दिले.महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात झालेली शेरेबाजी असभ्य होती, पण ती अश्लील नव्हती. अश्लील व असभ्य यामध्ये फरक असल्याचा निर्वाळाही केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. या कार्यक्रमात झालेली शेरेबाजी सर्वसामान्यांनी ऐकू नये अशी नव्हती, असा युक्तिवाद अ‍ॅड. महेश जेठमलानी यांनी एआयबीतर्फे केला.तसेच एआयबीचे सदस्य तन्मय भट व इतरांनी या कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केले नव्हते व यामध्ये अश्लील चित्रफिती दाखवल्या गेल्या नाहीत, असा दावाही अ‍ॅड. जेठमलानी यांनी केला. या कार्यक्रमात अश्लील शेरेबाजी झाल्याचा पुरावा पोलिसांकडे आहे व केरळ उच्च न्यायालयाचा निकाल या प्रकरणात लागू होऊ शकत नाही, असे सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.अखेर या प्रकरणी अनेक शहरांमध्ये गुन्हा नोंदवलेला असल्याने तूर्तास तरी एआयबीच्या सदस्यांना अटक करू नका, असे आदेश देऊन न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)वरळी येथे २० डिसेंबर २०१४ला हा कार्यक्रम झाला होता. त्यात दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता रणवीर कपूर व अर्जुन कपूर यांनी अश्लील शेरेबाजी केली होती. त्याची चित्रफीत गेल्या महिन्यात संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली. त्यानंतर ती व्हायरल झाली आणि टीका होऊ लागली. पुण्यात गुन्हा दाखल झाला. न्यायालयात जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आली.