Join us

मेट्रो ३ साठी हायटेक यंत्रणा

By admin | Updated: July 16, 2015 04:58 IST

कुलाबा- वांद्रे-सीप्झ हा संपूर्ण भुयारी असलेला मेट्रो-३ प्रकल्प देशातील सर्वाधिक पर्यावरणस्रेही बनविण्यासाठी मेट्रो-३ प्रयत्न करीत आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग

मुंबई : कुलाबा- वांद्रे-सीप्झ हा संपूर्ण भुयारी असलेला मेट्रो-३ प्रकल्प देशातील सर्वाधिक पर्यावरणस्रेही बनविण्यासाठी मेट्रो-३ प्रयत्न करीत आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणा, ऊर्जा बचत करणारी स्मार्ट वातानुकूलन यंत्रणा आणि प्रकाशयोजना, नैसर्गिक प्रकाशाचा वापर या हायटेक यंत्रणांचा वापर करण्यात येणार असून, यामध्ये रेल्वे स्टेशनांमधील प्रकाशयोजना गर्दीच्या प्रमाणानुसार बदलणारी असणार आहे.मेट्रो ३ प्रकल्प हा शंभर टक्के विजेवर चालणार असून, या प्रकल्पातून कार्बन उत्सर्जन शून्य टक्के असणार असल्याने रस्त्यांवरील वाहतुकीच्या प्रदूषणाने त्रासलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. तसेच या प्रकल्पात शक्य त्या सर्व मार्गांनी ऊर्जा बचत केली जाणार असल्याने ऊर्जा निर्माण होणाऱ्या ठिकाणचे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल, असे मेट्रो ३ चे कार्यकारी निर्देशक (विद्युत यंत्रणा) आर. के. शर्मा यांनी सांगितले.मेट्रो ३ ची रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणा हे या प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मेट्राच्या सर्व गाड्या ही यंत्रणा वापरणार असून, वापरण्यात आलेली ३४ टक्के ऊर्जा पुनर्निमित करून प्रणालीकडे परत पाठविणार आहेत. त्यामुळे मेट्रोची वर्षाला ५0 कोटी रुपयांची बचत होणार असून सुमारे ८ कोटी केडब्लूएच वीज इतर वापरासाठी उपलब्ध होणार असल्याचेही शर्मा म्हणाले.प्रकाशयोजनेसाठी मेट्रो ३ मध्ये सर्वत्र ८ ते १0 वॅट ऊर्जा वापरणाऱ्या एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येणार आहे. स्टेशनांमधील प्रकाशयोजना ही गर्दीच्या प्रमाणानुसार बदलणार असून खूप गर्दीच्या वेळी किंवा रश अवरमध्ये १00 टक्के दिवे सुरू असतील, तर थोडी कमी गर्दी असेल तेव्हा प्रकाशयोजना ६६ टक्के पातळीवर काम करेल आणि जेव्हा अगदीच तुरळक गर्दी असेल तेव्हा ही यंत्रणा ३३ टक्के पातळीवर काम करणार आहे. या गाड्यांमधील वातानुकूलन यंत्रणाही याच तत्त्वावर काम करणार असून, गाडीमधील प्रवाशांच्या संख्येनुसार वातानुकूलनाची तीव्रता कमी-जास्त होणार आहे. दरम्यान, मेट्रो ३ चे कारशेड आरे कॉलनीत उभारण्यास मुंबईकरांचा तीव्र विरोध आहे. यावर तोडगा निघाल्यास हा प्रकल्प मुंबईकरांना दिलासादायक ठरणार आहे. (प्रतिनिधी)