Join us  

हेरिटेज वास्तूचे सौंदर्य खुलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:34 AM

सीएसएमटी इमारत : राजस्थानी कारागिरांच्या हातून झळाळी

मुंबई : मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज वास्तूला नवीन झळाळी देण्याचे काम सुरू आहे. सीएसएमटीची वास्तू चारही बाजूंनी चमकविण्यासाठी कुशल राजस्थानी कारागीर नेमण्यात आले आहेत. काही दिवसांत सीएसएमटीचे रूप पालटणार असून, पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र बनेल.

सीएसएमटी मुख्यालयातील ‘स्टार चेंबर’ संपूर्ण वास्तूचा आत्मा आहे. इमारतीचा मुख्य गाभ्यात छोट्या-छोट्या नक्षीकामाचे सौंदर्य वाढविण्यात येत आहे. पहिल्या मजल्याला नवीन मुलामा दिला जात आहे.

रेल्वे तिकीट खिडकी, गॅलरी याचबरोबर ही वास्तू चारही बाजूंनी आकर्षक दिसण्यासाठी तिची डागडुजी करण्यात येत आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे वास्तूच्या दगडावर काळे डाग पडत आहेत. हे डाग शास्त्रशुद्ध पद्धतीने काढण्याचे काम सुरू आहे.च्यामध्ये हेरिटेज वास्तूच्या मुख्य बांधकामाला कोणताही धोका पोहोचविला जात नाही. इमारतीला नवीन झळाळी देण्यासाठी काम सुरू आहे. यासाठी ५१ करोड रुपये खर्च करण्यात आला आहे. नवीन रूपातील वास्तू पर्यटकांसाठी आकर्षित असेल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गॉथिक शैलीतील वास्तूची उभारणी, ‘सी’ अक्षराच्या आकारात एक अत्याधुनिक-नियोजनबद्ध पद्धतीने पूर्व-पश्चिमरीत्या सीएसएमटी वास्तूचे बांधकाम केले आहे. या वास्तूमधील सर्वांत आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे, वास्तूचा मुख्य घुमट व त्यावरील १६.६ इंचाचा उंच पुतळा. या पुतळ्याच्या एका हाताच्या खाली नक्षीदार चाक आणि दुसºया हातात मशाल आहे, हे प्रगतीचे प्रतीक दर्शवित आहे.

सीएसएमटी स्थानकांची इमारत ही जगातील सर्वांत सुंदर हेरिटेज स्थानकांची इमारत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वास्तूला २००४ साली युनेस्कोच्या वतीने ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्यात आले. ही वास्तू देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनल्यामुळे, २०१६ साली १० महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये निवडण्यात आले.