'राजभवनाच्या अंगणात जाण्यापेक्षा नागपूरच्या मतदारसंघात जाऊन लोकांना मदत करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 05:38 PM2020-05-22T17:38:00+5:302020-05-22T17:39:00+5:30

भाजपाच्या आंदोलनाचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली आहे

'Help people by going to Nagpur constituency devendra fadanvis instead of Raj Bhavan' thorat MMG | 'राजभवनाच्या अंगणात जाण्यापेक्षा नागपूरच्या मतदारसंघात जाऊन लोकांना मदत करा'

'राजभवनाच्या अंगणात जाण्यापेक्षा नागपूरच्या मतदारसंघात जाऊन लोकांना मदत करा'

Next

मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा खंबीरपणे सामना करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले आहे. वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वतःच्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

भाजपाच्या आंदोलनाचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली आहे. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल. परंतु, त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे. चंद्रकांत पाटील यांचे खरे आंगण कोणते? पुणे की कोल्हापूर? देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून मेरा आंगण मेरा रणांगण या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पहायला मिळाले, असे थोरात यांनी म्हटले. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना थोरात म्हणाले की, विविध राज्यांतील ५० लाखांहून अधिक मजुरांना रोजगार देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. केंद्राला कररूपाने सर्वाधिक उत्पन्न देऊनही महाराष्ट्राला केंद्राकडून अपेक्षित मदत दिली जात नाही. वैद्यकीय उपकरणे, PPE कीट, टेस्टिंग कीट, औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य मागणीच्या अवघे ३० टक्के पुरवली जात आहेत.

संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण आहे? राजकारणासाठी आयुष्य पडले आहे, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहास भाजपाची आजही ही काळी कृती कधीही विसरणार नाही. कोरोनाच्या लढाईत सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्स, पोलीस दल, सफाई कामगार यांच्यासह विविध क्षेत्रातले लोक व सामाजिक संस्था जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले योगदान देत आहेत. अशा वेळी एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सत्ता मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी गरीब जनतेला मदत करावी असे थोरात म्हणाले.
 

Web Title: 'Help people by going to Nagpur constituency devendra fadanvis instead of Raj Bhavan' thorat MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.