आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस, आमदार अतुल भातखळकर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:44 AM2021-05-13T10:44:35+5:302021-05-13T10:50:51+5:30

ज्या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होते, ते ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने पुरवठा केलेल्या लसींमधूनच होत होते.

Health Minister Rajesh Tope's statement is the culmination of lies, MLA Atul Bhatkhalkar's criticism | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस, आमदार अतुल भातखळकर यांची टीका

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस, आमदार अतुल भातखळकर यांची टीका

Next


मुंबई : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारची असून, या वयोगटातील नागरिकांकरिता राज्य सरकारने स्वतः लसींची खरेदी करून लसीकरण करायचे आहे. असे असतानाही स्वतः लस खरेदी करण्याची प्रक्रिया न राबवता केंद्राकडे बोट दाखवत, केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करावे लागत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लसीकरण धोरणानुसार देशात उत्पादन होणाऱ्या ५० टक्के लसी राज्य सरकार थेट कंपन्यांकडून विकत घेऊ शकते. परंतु महाविकास आघाडी सरकारने अद्यापपावेतो खरेदी प्रक्रिया राबविली नाही. रिलायन्स, फोर्टीस, वेलनेस यांसारख्या खासगी हॉस्पिटल्सनी याच काळात लाखो लसी विकत घेऊन लसीकरण सुरू केले. अशीच तत्परता दाखवत राज्य सरकारसुद्धा लस विकत घेऊ शकले असते. पण बेजबाबदार महाविकास आघाडी सरकारने ते का केले नाही? २८ एप्रिलला राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारने लस खरेदीच्या प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीचा शासन निर्णय ९ दिवसांनी म्हणजेच ७ मे रोजी काढला. १२ कोटी डोसची आवश्यकता असतानाही या शासन निर्णयात केवळ ७.७९ लाख डोसच विकत घेण्यास का मान्यता देण्यात आली? याच काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, मी आजच अदर पुनावाला यांच्याशी लस खरेदीबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे पोरकट विधान करून, हे महाविकास आघाडी सरकार लसीकरणातसुद्धा राजकारण करत असल्याचे सिद्ध केले, असा आरोप त्यांनी केला.

 १६ जानेवारी रोजी देशात लसीकरण सुरू झाल्यावर पहिल्या टप्प्यात सर्व कोरोनायोध्द्‌यांचे लसीकरण पूर्ण करणे अपेक्षित असतानाही, अद्याप तब्बल ४१ टक्के कोरोनायोद्धे लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत, याला जबाबदार कोण? ज्या अधिकच्या लसी बेकायदेशीरपणे जालन्याला नेण्यात आल्या, त्याचे उत्तर का देण्यात आले नाही? मुंबई महानगरपालिका स्वखर्चाने लस विकत घेण्यासाठी तयार असतानाही, राज्य सरकार त्यांना परवानगी का देत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला द्यावीत, असे भातखळकर म्हणाले.  लस खरेदी न करता खासगी हॉस्पिटल्सला लस खरेदी करायला देऊन नागरिकांना त्यांच्याकडून लस विकत घेण्यास भाग पाडायचे, असा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

सर्व नागरिकांचे लसीकरण करावे
ज्या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होते, ते ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने पुरवठा केलेल्या लसींमधूनच होत होते. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खोट्यावर खोटे बोलण्याचे हे दररोजचे काम आता बंद करून देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण कसे होईल, यासाठी काम करावे, असेसुद्धा भातखळकर यावेळी म्हणाले.
 

Web Title: Health Minister Rajesh Tope's statement is the culmination of lies, MLA Atul Bhatkhalkar's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.