Join us  

आरोग्य विभागाचा कृती आराखडा तयार

By admin | Published: May 25, 2015 2:29 AM

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार

नवी मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.पावसाळ्यात साथीचे आजार बळावतात. विशेषत: मलेरिया आणि डेंग्यूचा अधिक प्रादुर्भाव होतो. साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभाग कामाला लागला आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी ठिकठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासून पाहिले जात आहेत. डासांच्या उत्पत्तीच्या संभाव्य ठिकाणांचा शोध घेवून तेथे औषध फवारणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच जनजागृतीसाठी गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी माहितीपत्रके वाटली जाणार आहेत. विशेष म्हणजे संभाव्य साथीच्या रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावा, या रोगाचा फैलाव होवू नये या दृष्टीने महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार करण्याच्या सूचना रुग्णालय व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांची ३१ मेपर्यंत पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)