Join us  

कॅन्सरशी लढत तो देणार दहावीची परीक्षा

By admin | Published: March 03, 2015 10:31 PM

जिद्द माणसाला मोठे बनवते आणि चिकाटी यशाला खेचून आणते. अशाच एका जिद्द आणि चिकाटीने प्रेरित विद्यार्थ्याने कॅन्सरशीही दोन हात करीत दहावीची परीक्षा देण्याचा निश्चय केला आहे.

पूनम गुरव ल्ल नवी मुंबईजिद्द माणसाला मोठे बनवते आणि चिकाटी यशाला खेचून आणते. अशाच एका जिद्द आणि चिकाटीने प्रेरित विद्यार्थ्याने कॅन्सरशीही दोन हात करीत दहावीची परीक्षा देण्याचा निश्चय केला आहे. भविष्यात उत्तरोत्तर शिकून मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्याचा त्याचा मानस आहे. आज मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली तर गुरुवारी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेची विद्यार्थ्यांनी जोरात तयारी केली. मात्र सानपाडा सेक्टर - ५ येथील कॅन्सरग्रस्त ऋषभ शिखरे यात वेगळा ठरला आहे. आपल्या दर आठवड्याच्या केमोथेरपी, विविध स्वरूपाच्या चाचण्या आणि औषध - गोळ्या यांचा नियमित डोस घेत ऋषभ परीक्षेची तयारी करीत असून गुरुवारपासून तो परीक्षेलाही बसणार आहे. सानपाडा येथील विवेकानंद स्कूल शाळेच्या इंग्रजी माध्यमातून तो शिक्षण घेत आहे. वर्षभरापासून आजाराने ग्रस्त असल्याने त्याला दहावीच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळाला नाही, मात्र शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी विघ्ने आणि वर्गमैत्रीण करिष्मा ठाकूर यांच्या मदतीने त्याने दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गणित, हिंदी, मराठी, इंग्रजी या विषयांचा त्यांनी अभ्यास घेतला. परीक्षेसाठी आवश्यक तेवढी हजेरी नसतानाही तो शाळेतील हुशार विद्यार्थी असल्याने शाळेने त्याला दहावीची परीक्षा देण्याची संधी दिली. नेरूळ येथील एम. जी. एम. शाळेत परीक्षा केंद्र आहे. एप्रिल महिन्यात ऋषभला नाकाच्या हाडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. बांद्रा येथील होली फॅमिलीनंतर नानावटी हॉस्पिटलमध्ये त्याने उपचार घेतला. आतापर्यंत त्याच्यावर ४५ रेडिएशनद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सध्या केमोथेरपीसाठी हिरानंदानीमध्ये जावे लागत आहे. मात्र शिक्षणाची आवड असल्याने याही स्थितीत ऋषभ दहावीचा पहिला पेपर गुरुवारी देणार आहे. दहावीच्या परीक्षेचा अभ्यास तो घरी मित्र-मैत्रिणी, कुटुंबाच्या मदतीने करीत आहे. तीन तास बसणे ऋषभसाठी त्रासाचे असल्याने त्याला आरामदायी खुर्ची देण्याची मागणी करण्यात आली आहे.