Join us  

घरासाठी त्याने स्वत:लाच घेतले कोंडून - वरळी पोलिसांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 1:48 AM

१०८ निवृत्त पोलिसांना घराचा मोह सुटेना : घर खाली करण्याचे आव्हान

मनीषा म्हात्रेमुंबई : वरळी पोलीस वसाहतीत राहणारे सुरेश करकटे यांनी पोलिसांनी घरात डांबून ठेवल्याचा आरोप केल्यानंतर, पोलिसांनीही मौन सोडले. करकटे यांनी स्वत:च घरात कोंडून घेत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केल्याचे वरळी पोलिसांचे म्हणणे आहे. करकटेसारख्या १०८ निवृत्त पोलिसांना घराचा मोह सुटत नसल्याने पोलिसांपुढे अडचणी निर्माण होत आहेत.

वरळी पोलीस वसाहतीत राहणारे करकटे हे ३१ मे २०१७ रोजी सहायक पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी घरासाठी वाढीव मुदत मागितली. नियमानुसार, ३ महिने त्यांना मुदत मिळाली. मात्र त्यानंतरही विविध कारणे देत त्यांनी घर खाली करण्यास टाळाटाळ केली. मुदत उलटून दीड वर्ष झाले. मात्र करकटे घर खाली करण्यास तयार नाहीत. त्यासाठी त्यांना सहा वेळा नोटीस पाठविली. तरीदेखील ते अडूनच होते. त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच त्यांचे ७ लाख ६८ हजार २१० रुपये दंडनीय घरभाडेही थकीत आहे. या वेळी शनिवारी घरी आलेल्या पोलिसांनी ७ तास डांबून ठेवल्याचा आरोप करकटे यांनी केला. या प्रकारामुळे नानाविध चर्चांचे पेव फुटले.याबाबत वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वरळी पोलीस त्यांच्या घरी धडकले. तेव्हा घराला कुलूप होते. त्याच दरम्यान तेथे आलेल्या करकटे यांच्या मुलाने वडील मालाडला गेल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला. बराच वेळ थांबूनदेखील आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजाबाहेर वडील घरी परतताच पोलीस ठाण्यात येण्याबाबत नोटीस लावली; आणि टाळे सील केले. या सर्व प्रकाराचे त्यांनी रेकॉर्डिंग केल्याचेही नमूद केले.त्यानंतर बराच वेळाने करकटे घरात असल्याचे कुटुंबीयांकडून समजताच, पोलिसांनी टाळे उघडले. करकटेनेच डांबून ठेवल्याचा खोटा आरोप केल्याचे वर्पे यांनी सांगितले. त्यांना वेळोवेळी विनंती करूनदेखील ते सहकार्य करीत नसल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.करकटेच्या घरासाठी पोलीस निरीक्षक प्रतीक्षेतकरकटे राहत असलेले घर एका पोलीस निरीक्षकाला देण्यात आले आहे. मात्र करकटे ते खाली करीत नसल्याने संबंधित पोलीस निरीक्षक घराच्या प्रतीक्षेत ताटकळत आहेत.१०८ जणांची आडमुठी भूमिका... करकटेसारख्या १०८ पोलिसांनी निवृत्तीनंतर घर सोडलेले नाही. त्यांच्यामुळे नवीन भरती होणारे पोलीस घराच्या प्रतीक्षेत भाड्याच्या घरांत दिवस काढत आहेत. यात वरळी पोलीस वसाहतीतील ५० निवृत्त पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याकडून घर खाली करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.मुलांची शाळा, आई-वडिलांची तब्येत बरी नाही...पोलिसांनीच टाळे लावून घरात डांबले. तेव्हा घरात आई-वडील, चार लहान मुले आणि पत्नीसह वहिनी होत्या. त्या दिवशी घराला कुलूप नव्हते. पोलिसांनीच ते सील केले. वडिलांनी ३५ वर्षे सेवा केली. त्यात आई-वडिलांची तब्येत बरी नाही. अशात मुलांची शाळा सुरू आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शक्य झाले नाही. त्यांच्याकडे विनंती करून मुदतवाढ घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे करकटे यांचा मुलगा विकास यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :मुंबई