Join us

रेल्वे स्थानके होणार फेरीवाला मुक्त!

By admin | Updated: January 23, 2015 02:01 IST

रेल्वे स्थानकांतील पादचारी पूल असो वा अवतीभवतीचा परिसर दोन्ही ठिकाणी कायम फेरीवाल्यांचा गराडा असतो. दादरमध्ये हे दृष्य नेहमीचेच.

मुंबई : रेल्वे स्थानकांतील पादचारी पूल असो वा अवतीभवतीचा परिसर दोन्ही ठिकाणी कायम फेरीवाल्यांचा गराडा असतो. दादरमध्ये हे दृष्य नेहमीचेच. मात्र शुक्रवारी दादर स्थानकातील हे चित्रच पालटून गेले. रेल्वेच्या हद्दीत तसेच पादचारी पुलांवर असलेले फेरीवाले अचानक गायब झाले. हा बदल झाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यांनी काढलेल्या आदेशामुळे.रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश त्यांनी जारी केले असून त्याची सुरुवात दादर स्थानकापासून करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. हे आदेश आरपीएफला (रेल्वे सुरक्षा दल) देण्यात आले आहेत. मुंबई व उपनगरांमध्ये रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा असतो. याबाबतच्या तक्रारी रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी आरपीएफला दादर स्थानक आणि त्याच्या पादचारी पुलांवरुन फेरीवाल्यांना तात्काळ हटविण्याचे आदेश दिले. अन्य स्थानकांमधूनही फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांसाठीही हाच आदेश लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिकेचे सहकार्य आवश्यक यासंदर्भात आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पालिका आणि आरपीएफचीही एक बैठक झाली आहे. त्यांच्या सहकार्याने रेल्वेच्या हद्दीत तसेच पादचारी पुलांवरील फेरीवाले हटविण्यात येणार असून, सुरुवात दादर स्थानकापासून केली जाईल. दादर पूर्वेला रेल्वेचे आणखी एक कार्यालय आहे. त्याचप्रमाणे भाजपाचेही कार्यालय असून, येथे येण्यासाठी अनेकांना दादर स्थानकातून यावे लागते. मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्यानेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘त्यांच्या सोयीसाठी’ प्रथम दादर स्थानकापासून फेरीवाला हटविण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्वरित हा आदेश सर्व स्थानकांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही समजते. स्थानके फेरीवालामुक्त करण्याचे आदेश जरी देण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी आरपीएफकडून कितपत होईल, हा मोठा प्रश्न आहे. अनेक आरपीएफचे कर्मचारीच फेरीवाल्यांशीच गप्पा करताना दिसतात. त्यामुळे आरपीएफकडूनच त्याची कठोर अंमलबजावणी झाल्याशिवाय स्थानके फेरीवालामुक्त होणार नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामुळे आरपीएफच्या कारवाईकडेच आता लक्ष लागून राहिले आहे.