वसई : कोकणचा राजा अशी ओळख असलेल्या हापूस आंब्याचे वसई विरारमध्ये आगमन झाले आहे. परंतु या आंब्याच्या दराने सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. ३०० ते ४०० रू. डझन या दराने हा आंबा विकण्यात येत आहे. ५ डझनाच्या पेटीची किंमत अडीच ते तीन हजाराच्या घरात आहे. गेल्या खेपेस युरोपीय देशाने आपल्या आंब्याच्या निर्यातीस खो घातला होता त्यामुळे गेल्यावर्षी विपूल प्रमाणात आंबा उपलब्ध झाला व आंब्याचे दर प्रचंड प्रमाणात खाली आले होते. यंदा मात्र तशी परिस्थिती नसल्यामुळे दरामध्ये घसरण झाली नाही. ३०० ते ४०० रू. डझनाच्या भावाने विक्री करण्यात येत असल्यामुळे आंब्याला बाजारात उठाव नाही. हापूस आंब्याच्या या चढ्या भावामुळे कर्नाटकी व इतर राज्यातील आंब्यांना मात्र चांगली मागणी होत आहे. हा आंबा १५० ते २०० रू. डझन दराने मिळत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक या आंब्याच्या खरेदीकडे वळला आहे. ठाणे जिल्ह्याच्या विक्रमगड, जव्हार भागातही आंब्याचे उत्पन्न घेण्यात येत असते. या आंब्यालाही चांगली मागणी आहे. येत्या १५ दिवसात हापूस आंब्याचे दर खाली येण्याची शक्यता आहे. दशेरी, तोतापुरी व कर्नाटकी आंबा सध्या बाजारावर अधिराज्य गाजवत आहेत. (प्रतिनिधी)
हापूसच्या चढ्या भावाने सामान्य ग्राहक हवालदिल
By admin | Updated: April 1, 2015 22:29 IST