Join us  

हातपाटी वाळू व्यवसाय ठप्प्प

By admin | Published: November 18, 2014 10:45 PM

महाड तालुक्यातील दासगाव गावाजवळील खाडीमध्ये होणारा वाळू व्यवसाय गेली अनेक दिवस ठप्प्प आहे. त्यामुळे वाळू व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे

दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव गावाजवळील खाडीमध्ये होणारा वाळू व्यवसाय गेली अनेक दिवस ठप्प्प आहे. त्यामुळे वाळू व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दासगावप्रमाणेच जुई, कुंबळे, वराठी, केंबुर्ली आदी गावातही हीच स्थिती उद्भवली आहे. दासगावालगत असलेल्या खाडीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत होती. महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे संपूर्ण खाडी प्रदूषित झाल्याने मासेमारी व्यवसायावर गदा आली. त्यामुळे खाडीतील वाळू व्यवसायाने येथील ग्रामस्थांना आधार दिला. गेली काही वर्षे हा व्यवसाय चांगला चालला. हातपाटी या पारंपरिक पद्धतीने वाळू व्यवसाय सुरु होता. या व्यवसायामुळे याठिकाणी जवळपास दीडशे ते दोनशे जणांना मजुरीच्या स्वरुपात रोजगार उपलब्ध झाला खरा, मात्र हा व्यवसायही याठिकाणी तग धरु शकला नाही. खाडीतील रासायनिक सांडपाण्यामुळे मजूर व व्यावसायिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागल्याने गेले वर्षभर हा व्यवसाय ठप्प होता. दासगाव आणि परिसरातील खाडी पट्ट्यातील ठप्प वाळू व्यवसायामुळे वर्षभर येथील मजुरीवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आली आहे. वर्षभरापासून खाडीतल्या होड्या किनाऱ्यावर लागल्या आहेत. महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा फटका या भागातील वाळूव्यवसायाला बसला आहे. प्रदूषणाचा त्रास गेल्या वर्षभरापासून कमी जाणवत असला तरी प्रदूषण पूर्णत: थांबल्यास हा व्यवसाय पुन्हा सुरु होईल, अशी आशा येथील ग्रामस्थांना आहे.