आरटीआय कार्यकर्त्यावरील हल्ल्यामागे हातगाडी गँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 02:07 AM2019-11-05T02:07:32+5:302019-11-05T02:08:11+5:30

तिघे आरोपी कोठडीत : चौथा आरोपी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात

Handgun gang behind attack on RTI activist | आरटीआय कार्यकर्त्यावरील हल्ल्यामागे हातगाडी गँग

आरटीआय कार्यकर्त्यावरील हल्ल्यामागे हातगाडी गँग

googlenewsNext

मुंबई : विक्रोळी येथील आरटीआय कार्यकर्ते मनोहर जरीयाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी सुपारी देण्यामागे घाटकोपर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना भाड्याने हातगाड्या पुरवणाऱ्यांची टोळी असल्याचे तपासात उघड झाल्याने या प्रकरणात हकीम शेख या चौथ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

पूर्व उपनगरासह मुंबईतील अनेक प्रकरणांमध्ये माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडणारे जरीयाल यांच्यावर ६ आॅक्टोबर रोजी चॉपरने हल्ला झाला होता. त्या प्रकरणी पार्कसाइट पोलिसांनी रिझवान हमीद सय्यद याला अटक केली. चौकशीत त्याने अब्दुल्ला अबुताली खान आणि साजीद सय्यद यांच्या सांगण्यावरून दहा हजार रुपयांची सुपारी घेत हल्ला केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, जरीयाल यांनी केलेल्या तक्रारींवरून अनधिकृत फेरीवाल्यांच्या कारवायांमध्ये अडथळे येऊ लागल्याने हकीम शेख याने हा कट रचल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल केला. महापालिका एन विभागातील घाटकोपर पूर्व आणि पश्चिम, अमृतनगर, पार्कसाइट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना हातगाड्या भाड्याने देणारी टोळी सक्रिय आहे. या टोळीकडून सुमारे आठशे गाड्या भाड्याने दिल्या जातात.
आरोपी अब्दुल्ला खान आणि साजीद सय्यद हे त्या टोळीशी संबंधित आहेत. जरीयाल यांच्या तक्रारींमुळे हातगाड्यांविरोधात कारवाई होऊ लागल्याने ही टोळी संतापली होती. हकीम शेख हा अब्दुल्ला खानचा नातेवाईक असून या टोळीच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या टोळीविरोधात कारवाई करण्याची मागणी जरीयाल यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

टोळीच्या कारवाया
सात ते आठ जणांची ही टोळी घाटकोपर भागातील मोक्याच्या जागा अडवते आणि तेथे हातगाड्या लावून त्या अनधिकृत फेरीचा धंदा करण्यासाठी भाड्याने देते. या सर्व टोळीचालकांची नावे जरीयाल यांनी पोलीस आयुक्तांना दिली आहेत.

Web Title: Handgun gang behind attack on RTI activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.