Join us  

भात लावणीच्या खर्चात मशीनने झाली निम्मी बचत

By admin | Published: July 07, 2015 12:59 AM

खाचरातील चिखलात मजुरांच्या साहाय्याने भाताची होणारी पारंपरिक लागवड आता ‘भात रोवणी’ यंत्राद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अल्पशा खर्चात करता येणार आहे

सुरेश लोखंडे ठाणेखाचरातील चिखलात मजुरांच्या साहाय्याने भाताची होणारी पारंपरिक लागवड आता ‘भात रोवणी’ यंत्राद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अल्पशा खर्चात करता येणार आहे. एकरी सुमारे सात हजार ५०० रुपये मजुरीऐवजी मशीनद्वारे केवळ तीन हजार ५०० रुपये खर्चात एक एकर शेतात भात लावणे शक्य होत असल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केला.पारंपरिक पद्धतीने मजुरांकडून भात लागवड केली जाते. पण, यांत्रिक शेतीच्या युगात आता ही लागवड ‘भात रोवणी’ यंत्राद्वारे राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात प्रथमच केली जात आहे. या खरीप हंगामात पहिल्यांदा जिल्ह्यातील भात लागवड यंत्राद्वारे केली जात आहे. यासाठी शहापूर व भिवंडी तालुक्यांची प्राधान्यक्रमाने निवड करण्यात आली आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाखाली १० यंत्रांची खरेदी करून बचत गटांच्या स्वाधीन केले आहे. एकरी माफक दराने यंत्राद्वारे शेतकऱ्यांना भाताची लागवड करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. मजुरांची कमतरता, महागाईमुळे वाढलेली मजुरी, मिळणारे अल्पसे उत्पादन आदी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या भात रोवणी यंत्रांची खरेदी केली आहे. सुमारे एक महिन्याच्या कालावधीत या यंत्राद्वारे जिल्ह्यातील भात लागवडीचे संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. त्याद्वारे बचत गटांना सुमारे तीन लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे. हंगामी स्वरूपाच्या या यंत्राचा वापर दुसऱ्या वर्षीदेखील करता येणार आहे. संबंधित कंपनीने या यंत्राची वॉरंटी दिल्यामुळे ते नादुरुस्त होण्याचा प्रश्नच उद्भवणार नसल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. या आधी केवळ आंध्र प्रदेश व केरळ राज्यांत या यंत्राद्वारे लागवड केली जात असे.