राज यांच्यात दिसते बाळासाहेबांची छबी; कांचनगिरी यांच्या विधानाने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:07 AM2021-10-19T10:07:22+5:302021-10-19T10:08:02+5:30

अयोध्येतील संत-महंत ‘कृष्णकुंज’वर

guru maa kanchan giri said the image of balasaheb thackeray can be seen in raj thackeray | राज यांच्यात दिसते बाळासाहेबांची छबी; कांचनगिरी यांच्या विधानाने नवा वाद

राज यांच्यात दिसते बाळासाहेबांची छबी; कांचनगिरी यांच्या विधानाने नवा वाद

Next

मुंबई : राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते, बोलतात ते खरे करून दाखवितात, उत्तर भारतीयांबद्दल त्यांच्या मनात प्रेमच आहे, मुंबईतील उत्तर भारतीयांनी निश्चिंत राहावे, हिंदुत्वाच्या मुद्यांवर राज यांनी भाजपसोबत जावे, ही विधाने आहेत साध्वी माँ कांचनगिरी यांची. अयोध्येतील संत-महंतांनी सोमवारी कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
 
जुना आखाड्याच्या साध्वी माँ कांचनगिरी या त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे ओळखल्या जातात. विशेषतः उत्तर भारतात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. कांचनगिरी यांनी आज सूर्याचार्य महाराजांसमवेत राज ठाकरे आणि कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संत-महतांसोबत ठाकरे यांनी अर्धा तास चर्चाही केली. यानंतर माध्यमांशी बोलताना कांचनगिरी म्हणाल्या की, राज यांना अयोध्या भेटीचे निमंत्रण दिले असून, डिसेंबरअखेर त्यांचा अयोध्या दौरा होण्याची शक्यता आहे. राज यांच्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसते. बोलतात ते खरे करून दाखवितात. जे बोलण्यावर ठाम नाहीत त्यांच्यासोबत चर्चा करून वेळ फुकट घालवीत नाहीत. जे बोलण्यावर ठाम आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत, असे सांगत कांचनगिरी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

स्थानिकांच्या रोजगारावर ते बोलत असतात. परप्रांतियांबद्दल कोणत्याही पद्धतीचा द्वेष मला त्यांच्या बोलण्यात दिसला नाही. उत्तर भारतीयांवर त्यांचे प्रेम आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांनी निश्चिंत असावे, असे कांचनगिरी म्हणाल्या. तसेच, देशात एक वेगळ्या पद्धतीचे हिंदुत्व समोर येत आहे. ब्रिटिशांपेक्षाही जास्त भारी पडण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवे. हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर राज ठाकरे यांनी भाजपसोबत युती करावी, असे आवाहन त्यांनी केले. 

...कांचनगिरी कुठे होत्या?
बाळासाहेबांच्या पुत्राने रामजन्मभूमीवर जाऊन ज्या पद्धतीने काम केले तेव्हा कांचनगिरी कुठे होत्या, असा प्रश्न करीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला. बाळासाहेबांच्या सुपुत्रावर महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरींना नाही, असेही पेडणेकर म्हणाल्या.

Web Title: guru maa kanchan giri said the image of balasaheb thackeray can be seen in raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.