Join us

तोफा थंडावल्या

By admin | Updated: June 12, 2015 23:05 IST

मतदानाच्या प्रचाराचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. प्रत्येक राजकीय पक्षाने दिवसभर जोरदार प्रचार केला. सायंकाळी ५ वा. प्रचाराची रणधुमाळी थांबली

वसई : मतदानाच्या प्रचाराचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. प्रत्येक राजकीय पक्षाने दिवसभर जोरदार प्रचार केला. सायंकाळी ५ वा. प्रचाराची रणधुमाळी थांबली. शनिवारी विश्रांती घेऊन रविवारी सकाळी ७.३० वा. प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होणार आहे. राजकीय पक्षांनी मतदानाच्या दिवशी आपली यंत्रणा सज्ज राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेले १० दिवस सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक वॉर्ड अक्षरश: पिंजून काढला. उमेदवारांनी प्रचार करताना कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. या प्रचारादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. संपूर्ण प्रचार प्रक्रिया शांततेत पार पडली.एकूण ११५ जागांसाठी मतदार होणार होते. परंतु, बविआचे ४ उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याने उर्वरित १११ जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात बविआ, सेना-भाजपा युती, काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी, जनता दल हे प्रमुख पक्ष असले तरी खरी लढत बविआ व सेनेमध्ये आहे. भाजपाने उमेदवार उभे केले असले तरी त्यांना कितपत यश मिळेल, याबाबत साशंकताच आहे. प्रचारामध्ये याच पक्षांनी आघाडी घेतली तर इतर पक्षांकडून प्रभावी प्रचार होऊ शकला नाही. सतत प्रचारामध्ये असणारे कार्यकर्ते आता काहीसे निवांत झाले आहेत. प्रचार थांबला असला तरी अनेक राजकीय पक्ष छुप्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. (प्रतिनिधी)