Join us  

जोगेश्वरीचे गुंफा मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:33 AM

- डॉ. सूरज अ. पंडितपाशुपत शैवमताची मुळे येथे साधारण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात रोवली गेली. हा काळ भारत-रोम व्यापाराचे ...

- डॉ. सूरज अ. पंडितपाशुपत शैवमताची मुळे येथे साधारण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात रोवली गेली. हा काळ भारत-रोम व्यापाराचे सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. कांदिवली जवळच्या पडणच्या (बाणडोंगरी) टेकाडावर ‘कोसिकयस उदयो आरामोच’ असा पुराभिलेख मिळाला होता. हा ‘कौशिकेय’ म्हणजे लकुलीशाच्या ‘कुशिक’ नामक शिष्याच्या परंपरेतील असावा. लकुलीश हा पाशुपत शैवमताचा प्रणेता मानला जातो. पुराणांनी त्याला प्रत्यक्ष शिवाचा अवतार कल्पिले आहे. हा लकुलीश इ.स.च्या पहिल्या शतकात बडोद्याजवळील कारवण गावी होऊन गेला असावा. मुंबई परिसरात सोपारा-कान्हेरी अशा बौद्ध केंद्रांची भरभराट होत असताना, त्यांच्या उत्तरेकडून येणाºया या नव्या तत्त्वज्ञानाची पाळेमुळे रुजत होती. काही विद्वानांनी कर्जतजवळील आंबिवली लेण्यांतील शिलालेखांचा अभ्यास केला असता, ही लेणी शैवपंथी असू शकतात, असे मत प्रतिपादले आहे.

त्रैकुटकांनंतर मुंबई परिसरात माळवा-गुजरात परिसरातून आलेल्या कलचुरी राजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांच्या कारकिर्दीत मुंबईतील शैवमठांना भरभराटीचे दिवस आले. मुंबईतील सर्वात मोठे शैवलेणे मजासगावाच्या पश्चिमेस आणि अंबोली गावाच्या पूर्वेस एका टेकाडामध्ये हे लेणे खोदले गेले. यालाच आज आपण ‘जोगेश्वरी गुंफा मंदिर’ म्हणून ओळखतो. या लेण्यांच्या उत्तरेला एक स्मशान आहे, ज्यामुळे या परिसराला पूर्वी ‘स्मशान टेकडीचा परिसर’ असेही म्हणत. या लेण्याचा काळ इ.स.नाच्या सहाव्या शतकाच्या पूर्वार्धातील असावा, असे येथील शैलीवरून व अलंकारांवरून वाटते.

या लेण्यात रावणानुग्रह मूर्ती, नटेश, सारीपाट क्र ीडा, कल्याणसुंदरमूर्ती, लकुलीशपट्ट, महिषासूरमर्दिनी, गजांतकशिव/अंधकासुर अनुग्रह मूर्ती, गणेश, सप्तमातृका असे अनेक शिल्पपट्ट पाहायला मिळतात. या लेण्याची रचना फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. टेकडीचा मधला भाग कोरून मंडपाची रचना केलेली दिसते. या मंडपाच्या मध्यभागी चारही बाजूंना दरवाजे असलेले ‘सर्वतोभद्र’ गर्भगृह आहे. या मंडपाच्या पूर्व व पश्चिम दिशांना मंदिराचे प्रवेशद्वारे असून, पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ गणेशादी मूर्ती आहेत. या मंडपाच्या दक्षिणेला एक ओसरी असून, येथे एक भग्नावशेषातील पुराभिलेख आहे. याच लेण्याच्या परिसरात इतरही दोन लहान लेणी आहेत. ही सारीच लेणी आजही वापरात आहेत. येथील फारसा चांगला नसलेला दगड आणि वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष यामुळे या लेण्यांची बरीच पडझड झाली आहे.

जोगेश्वरी येथील लेण्याच्या घडणीमध्ये पाशुपत तत्त्वज्ञान आणि त्यांचे धार्मिक विधी यांचा बारकाईने विचार केलेला दिसतो. एका विशिष्ट शैव परंपरेशी निगडित असलेले हे या परिसरातील पहिलेच लेणे. हा त्यांचा मठ असावा. या लेण्याने पुढील स्थापत्य परंपरेचा पाया घातला. मुळातच तंत्रज्ञानदृष्ट्या ‘लेणे’ असलेले हे ‘मंदिर’ म्हणजे स्थपतींनी घडविलेला चमत्कारच होय. छिन्नी व हातोडीच्या साहाय्याने एवढा प्रशस्त मंडप खोदणे हे अविश्वसनीय वाटते. येथील शिल्पसांभार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे दिसणारी प्रतिहारांची शिल्पे अतिभव्य असून, त्यांचे सेवकच मनुष्याकृती एवढे आहेत. या लेण्यांनी भव्यतेला एक वेगळे परिमाण दिले. यापूर्वीची बौद्ध लेणी साधी, सुटसुटीत होती. कान्हेरीच्या लेणी क्र मांक तीन सारखी मोठी चैत्यगृहेही पाहायला मिळतात, परंतु या लेण्यांची भव्यता आणि त्याच्या सौंदर्याची परीभाषा वेगळीच आहे. या लेण्याने पुढे लेण्यांच्या स्वरूपात खोदल्या गेलेल्या एलिफंटा (घारापुरी) व मंडपेश्वरच्या मठस्थापत्याचा पाया घातला. या साऱ्यांचा विचार आपण पुढील काही लेखांत करणारच आहोत.(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)