ठळक मुद्देराज्यपालांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे निवेदन वाचून दाखवले.देशाच्या विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या ३१ पोलीस अधिकारी आणि २६१ पोलीस अंमलदारांची नावे यावेळी वाचून दाखविण्यात आली.

मुंबई - गेल्या संपूर्ण वर्षांत भारतातील विविध पोलीस दलांमधील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली आहे. दादर येथील नायगाव पोलीस मुख्यालय येथे आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला राज्यपालांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे निवेदन वाचून दाखवले. त्यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली.  

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना पोलीस स्मृती दिन दरवर्षीप्रमाणे यंदा साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी देखील हुतात्मा स्तंभाजवळ जावून पुष्पचक्र वाहिले. देशाच्या विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या ३१ पोलीस अधिकारी आणि २६१ पोलीस अंमलदारांची नावे यावेळी वाचून दाखविण्यात आली.पोलीस परेडने ‘शोक शस्त्र’ सादर केल्यानंतर परेड सलामी झाली आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. बिगुलर्स ‘लास्ट पोस्ट’ आणि राऊज वाजविल्यानंतर परेडची सांगता झाली. कार्यक्रमाला विविध देशांचे राजनैयिक प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील आजी व सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यात देखील पोलीस दिननिमीत्त शहीद पोलिसांना मानवंदना पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सादर केली. 


Web Title: Greetings of Governor's Martyrs on Police Remembrance Day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.