लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कन्नमवार नगरमध्ये राहणाऱ्या नर्सेस, महिला पोलीस व आया या कोरोना रोगाच्या संकटातून मुंबईकरांना बाहेर काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मुंबईतील विविध ठिकाणी अविरतपणे आपली सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या संकटात अनेकांचे जीव वाचवून मुंबईकरांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असलेल्या या सर्व कन्नमवार नगरमधील महिला साक्षात दुर्गाच आहेत, हे मानून यशोदीप फाउंडेशनच्या वतीने नुकतेच या सर्व महिलांना ‘कन्नमवारच्या दुर्गा’ म्हणून गौरविण्यात आले. स्थानिक आमदार सुनील राऊत, नगरसेवक उपेंद्र सावंत, यशोदीप फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश सोनमळे यांच्या उपस्थितीत कन्नमवार नगरमधील या दुर्गांचा सत्कार करण्यात आला. या महिलांना कोरोना काळात मानसिक आधार देणाऱ्या आणि त्यांच्या पत्नीच्या अनुपस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळलेल्या त्यांच्या पती अथवा पालकांचाही सन्मान या वेळी करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेल्या महिलांमध्ये बहुतांश नर्सेस असून त्या नायर, केईएम, सायन, कुर्ला भाभा, शुश्रूषा, राजावाडी, महात्मा फुले व इतर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटात अगदी सुरुवातीपासून त्या कोविड वॉर्डमध्ये काम करीत आहेत. तर इतर महिला पोलीस शिपाई, होमगार्ड, आया व आरोग्य सेविका म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. या सर्व महिलांना कोरोनाच्या संकटात आपली सेवा देताना आपल्यापासून आपल्या कुटुंबीयांना संसर्ग होऊ नये म्हणून बराच काळ हॉटेलमध्ये वास्तव्य करावे लागले तर काहींना लॉकडाऊनमध्ये खडतर प्रवास करून आपली सेवा बजवावी लागली.
या कोरोना काळात त्यांना कोणकोणत्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले हे सत्कारप्रसंगी उपस्थितांसमोर सांगताना काहींना अश्रू अनावर झाले होते.
आमच्या या सेवेची दखल घेऊन यशोदीप फाउंडेशनच्या प्रकाश सोनमळे यांनी आमच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आम्हाला पुढच्या कार्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना सरकारमूर्ती कन्नमवारच्या दुर्गांनी व्यक्त केल्या.
--------------------------------------------