Join us

वृक्षांची गणना ग्रामसेवकांकडे

By admin | Updated: May 12, 2014 06:13 IST

पर्यावरण संतुलित वृक्ष लागवड केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर आजवर लावण्यात आलेल्या वृक्षांची मोजणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

बोर्ली -मांडला: पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजनेसह शासनाच्या इतर योजनेंतर्गत वृक्ष लागवड केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर आजवर लावण्यात आलेल्या वृक्षांची मोजणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामाची जबाबदारी ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आली आहे. सरकारी व इतर योजनांमार्फत ग्रामस्तरावर वृक्षारोपण करण्यात येते. परंतु काही ग्रामपंचायतींमध्ये कागदोपत्रीच वृक्ष लावगड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे वृक्ष लावगड व त्यासाठीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकारही झाल्याचा आरोपही अनेकदा केला जातो. म्हणून लागवड केलेल्या वृक्षांची प्रत्यक्षात मोजणी करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला. योजनेसाठी देण्यात आलेल्या निधीचा किती उपयोग वृक्ष लावण्यासाठी केला गेला हे वृक्ष गणनेनंतरच उघडकीस येवू शकेल. जनगणना, पशुगणनेप्रमाणे आता गाव परिसरातील वृक्षाची गणना केली जाणार आहे. गावांचा विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरण आधारीत विकास करण्याच्या नावाखाली शासनाने पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी लोकसंख्येच्या प्रमाणात कर वसुली लोकसंख्येच्या ५० टक्के वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त गाव, गोबर गॅस, घनकचरा व्यवस्थापन आदी निकष लावले आहेत. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायतींनी कोट्यवधींचा निधी प्राप्त केला. या निधीच्या तुलनेत वृक्षारोपण व संवर्धन झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शासनाच्या निधीचा योग्य उपयोग व्हावा आणि वृक्षरोपणानंतर त्यांचे संवर्धन होवून पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने शासन आता वृक्षांची गणना करणार आहे. (वार्ताहर)