Join us

मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ श्रेणीचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील अग्रगणी विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ श्रेणीचा दर्जा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील अग्रगणी विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडेकडून (नॅक) मुंबई विद्यापीठास ३.६५ सीजीपीए गुणांकन देण्यात आले आहे. नॅककडून सर्वाधिक गुण मिळालेले मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

नुकतेच २४ ते २६ ऑगस्ट २०२१ दरम्यान नॅक पीअर टीमने विद्यापीठांत भेट दिली होती. पहिल्या टप्प्याअंतर्गत नवीन निकषानुसार विद्यापीठाने आयआयक्यूए आणि स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल सादर केला होता. प्रत्यक्ष भेटीच्या नियोजनाचा भाग म्हणून विद्यापीठाने कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन यशस्वी नियोजन केले होते. यामध्ये विविध समित्यांचे गठन करण्यात आले होते. नॅक टीमच्या पहिल्या दिवसाच्या भेटीदरम्यान विविध १२ विभागांचे सादरीकरण तर दुसऱ्या दिवशी १५ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. विविध भागधारक यांच्याशी पीआर टीमने संवाद साधला. त्याचबरोबर विविध विभागांना भेटी, प्रयोगशाळा पाहणी, पायाभूत सुविधा, ग्रंथालय भेटी देण्यात आल्या. यामध्ये अध्ययन व अध्यापन प्रणाली आणि संस्थात्मक मूल्ये आणि उत्तम उपक्रम विद्यापीठाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. ज्यामध्ये हरित उपक्रम, कौशल्याधारीत शिक्षण, व्हॅल्यू ॲडेड शिक्षणक्रम, वारसा जतन आणि संवर्धन, ग्रंथालय यांचा समावेश आहे. विद्यापीठाने विविध विद्याशाखांतर्गत दिलेले भरीव योगदान, संशोधन वृतीला चालना, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास अशा सर्व बाबतीत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ श्रेणीसह सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे ही अत्यंत अभिमानस्पद बाब आहे. विद्यापीठाला मिळालेल्या या सर्वोत्तम श्रेणीचा फायदा हा विद्यापीठासह सर्वच भागधारकांना नक्कीच होईल. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व भागधारकांचे विशेष आभार मानतो.

- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाला नॅककडून ३.६५ एवढे गुण प्राप्त होऊन अ श्रेणी मिळणे ही कौतुकास्पद बाब आहे. स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल ते नॅक पीअर टीमच्या प्रत्यक्ष भेटीचे विशेष नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आले. यासाठी विद्यापीठाच्या आयक्यूएसी सेल आणि सर्वच घटकांनी प्रयत्न केले. समूह प्रयत्नाची ही फलनिश्पत्ती आहे.

- प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

नॅक मूल्यांकनासाठी विविध निकषांची पूर्तता करण्यासाठी, माहितीचे संकलन ते विविध अहवाल तयार करण्यासाठी व प्रत्यक्ष भेटीच्या नियोजनासाठी विद्यापीठाच्या विविध भागधारकांनी अथक प्रयत्न व सहकार्य केले.

- प्रा. स्मिता शुक्ला, आयक्यूएसी सेल, मुंबई विद्यापीठ