Join us  

गोविंदा पथकांची विम्याची घागर उताणीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 6:47 AM

अल्प प्रतिसाद : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, चिपळूण, उरण भागात केवळ २३० मंडळांनी काढला विमा

मुंबई : अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गोकुळाष्टमीसाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. पूर्वी केवळ सण म्हणून साजऱ्या होणाºया या उत्सवाला आता स्पर्धेचे स्वरूप आले. त्यामुळे थरांवर थर रचत हंंडीचे ‘लक्ष्य’ गाठणाºया गोविंदा पथकांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आहे. गेल्या काही वर्षांपासून या गोविंदा पथकांना विमा कवचही दिले जाते. मात्र, यंदा हे विम्याचे कवच घेणाºया गोविंदा पथकांची घागर उताणीच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गोविंदा पथकांचा विमा काढणाºया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, चिपळूण आणि उरण या सर्व विभागांतील मिळून केवळ २३० गोविंदा पथकांनी विमा काढला आहे. यात वैयक्तिकरीत्या म्हणजेच स्वत:हून विमा काढण्यासाठी पुढाकार घेतलेल्या गोविंदा पथकांची संख्या अवघी ८२ इतकी आहे. याखेरीज साई सेवा वैद्यकीय ट्रस्ट ३२, सीताबेन शहा ट्रस्ट ५२, जनता जागृती मंच २३ आणि खासगी एनर्जी ड्रिंक कंपनीने ४१ गोविंदा पथकांचा विमा काढला आहे. या विम्यात अपघाती मृत्यूकरिता गोविंदा पथकातील खेळाडूस नुकसानभरपाई देण्यात येते. त्यात अपघाती मृत्यूस १० लाख रुपये, दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपयांचे कवच आहे. शिवाय, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, तर कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व आल्यासही विमाकवच मिळेल. तसेच, अपघातामुळे होणारा रुग्णालयाचा १ लाखापर्यंतचा खर्च या विम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. विम्याची पूर्तता करण्यासाठी मंडळाच्या लेटरहेडवर गोंविदाचे नाव आणि वय अशी यादी असणे गरजेचे आहे. तर विमा संरक्षणाचा कालावधी गुरुपौर्णिमा किंवा विमा प्रिमियमपासून गोविंदाचा सराव आणि ४ सप्टेंबर पहाटे ६ वाजेपर्यंत आहे.पथकांची संख्या होतेय कमीमुंबई शहरात साधारण २०० पथके आहेत, तर उपनगरांत ३०० पथके आहेत. याशिवाय, नवी मुंबई , पालघर आणि ठाण्यात साधारण ४०० - ५०० पथके आहेत. मात्र मागील काही वर्षांचे चित्र पाहता ही गोविंदा पथकांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते आहे.वैयक्तिक विमा काढण्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. मात्र राजकीय संस्था-व्यक्ती, सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गोविंदा पथकांचा विमा काढण्याचे प्रमाण त्या तुलनेत अधिक आहे. येत्या ४-५ दिवसांत आणखी आकडा वाढेल अशी आशा आहे.- सचिन खानविलकर,विमा सहाय्यक प्रबंधक.

टॅग्स :मुंबईगोविंदा