Join us  

मराठी भाषा भवनाविषयी सरकारची ‘धूळफेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 6:15 AM

उपकेंद्रही मुंबईच्या वेशीबाहेर : मराठीविषयक तज्ज्ञांची नाराजी

स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी भाषा भवन मुंबईत व्हावे, यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष सुरू आहे. मराठी भाषेवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात नुकतेच मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धरणे आंदोलनही करण्यात आले. मात्र, तरीही राज्य शासनाने मराठी भाषा भवनाविषयी ‘धूळफेक’ करीत, मुख्य केंद्रांविषयी हालचाल न करता, थेट मराठी भाषा भवन उपकेंद्राचा घाट घातला आहे. मराठी भाषा विभागाने हे उपकेंद्रही मुंबईच्या वेशीबाहेर सिडकोच्या नवी मुंबईतील जागेत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी मराठीविषयक तज्ज्ञांमध्ये नाराजी असून, हा निर्णय अमान्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील कार्यान्वित असलेली भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणिसंस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशी निर्मिती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था मुंबईत विविध ठिकाणी कार्यरत आहेत. या संस्थाच्या कामात समन्वय राहावा, यासाठी ही कार्यालये एकाच इमारतीत असावी, या उद्देशाने शासनाने सिडको महामंडळाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार, मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी नवी मुंबई ऐरोली येथील जागेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून, त्यासाठी ३,१८४. ९२ चौ.मी परिसरात इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २३ कोटी४४ लाख ११ हजार इतक्या  निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

मराठी भाषा भवनासाठी दक्षिण मुंबईतील रंगभवनाची जागा पाहिली होती, पण रंगभवनाची जागा हेरिटेजच्या यादीत गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान, त्या जागेविषयी पुनर्विचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देतो, असे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे, नवी मुंबईतील उपकेंद्राचा घाटही जुना आहे. ज्या राज्याच्या स्थापनेला भाषिक इतिहास आहे, त्या राज्यात मराठी भाषा भवनाला जागा मिळत नाही, हे दुर्दैवी आहे. आता सरकारने उपकेंद्राचा विचार करण्याऐवजी मूळ भाषा भवनाचा विचार करायला पाहिजे. मराठी भाषा भवनाचे उपकेंद्र हे जिल्ह्या-जिल्ह्यांत व्हायला हवे. मात्र, मुख्य भवन हे दक्षिण मुंबईतच असायला हवे हीच मागणी आहे, असे परखड मत मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी मांडले.मराठी भाषा विभागाचा निर्णय अमान्यमराठी भाषा भवन हे रंगभवन येथेच व्हावे, ही आमची मागणी कायम आहे. मराठी भाषा विभागाचा मराठी भाषा भवन उपकेंद्राविषयीचा निर्णय मान्य नाही. आधी मूळ केंद्र झाले की, विविध भागांत उपकेंद्र केले जाऊ शकते. मात्र, मुख्य भवनाविषयी ठोस निर्णय न घेता, उपकेंद्राचा घाट घालणे चुकीचे आहे. उपकेंद्राविषयी निर्णय घेताना आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. मात्र, आता पुन्हा या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी शासनाशी चर्चा करण्यात येईल. मराठी भाषा भवनाचे मूळ केंद्र सुरू असताना उपकेंद्र स्थापन करणे हा उचित निर्णय नाही.- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, कार्याध्यक्ष, मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ