ग्रामव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकार प्रयत्नशील- हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:10 AM2020-01-10T06:10:10+5:302020-01-10T06:13:16+5:30

खेडी सुधारित नाहीत तोवर देश सुधारणार नाही. महाराष्ट्रातील २८ हजार सरपंच आहेत.

Government is trying to strengthen village system: Hasan Mushrif | ग्रामव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकार प्रयत्नशील- हसन मुश्रीफ

ग्रामव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकार प्रयत्नशील- हसन मुश्रीफ

googlenewsNext

मुंबई : खेडी सुधारित नाहीत तोवर देश सुधारणार नाही. महाराष्ट्रातील २८ हजार सरपंच आहेत. त्यांच्या मदतीने सर्व गावे स्वच्छ आणि सुंदर करणार असल्याचा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरूवारी व्यक्त केला. बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच आॅफ द इअर पुरस्कार सोहळ्यात मुश्रीफ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली.
राज्यातील सरपंचांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष होते. या सोहळ्यास मुश्रीफ यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री नवाब मलिक, यशोमती ठाकुर, राज्यमंत्री विश्वजीत कदम, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे संपादकीय आणि सहव्यवस्थापकीय संचालक ॠषी दर्डा, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, बीकेटी टायर्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी प्रास्ताविक केले तर सोहळ्याचे सुत्रसंचालन हेमांगी कवी यांनी केले.
कृषी विकासात आमचे योगदान
कृषी विकासात आमचे योगदान आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही आगामी काळातही प्रयत्नशील राहू. अमेरिका आणि युरोपात आम्ही आमचे काम वाढवित आहोत. ‘लोकमत’च्या या कार्यक्रमांशी सातत्याने जोडले राहू, असे बीकेटी टायर्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार म्हणाले.
लोकमतची थाप उर्जा देणारी
सरपंच अवॉर्ड असो अथवा पार्लमेंटेरीअन अवॉर्ड. ‘लोकमत’ सर्व घटकांवर नजर ठेऊन आहे. चांगल्या कामाची दखल घेतो, पाठ थोपटतो. आमदार म्हणून विधानसभेतील कामकाजात आम्ही भाग घेतो. वर्षानुवर्षे लोकांचे विषय मांडत राहतो. कधीकधी वाटत कोणी दखल तरी घेत का आपली? पण, ‘लोकमत’ कौतुकाची थाप देतो. तेंव्हा कामाचे चीज झाल्याची भावना दाटून येते, अशा शब्दात महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.
>थेट सरपंच निवड नकोच
सरपंच किंवा नगराध्यक्ष थेट निवडायचा तर मग मुख्यमंत्री का नको, असा सवाल करत हसन मुश्रीफ यांनी थेट सरपंच निवडीला विरोध केला. थेट सरपंच निवडीची पद्धत बंद करण्याबाबतचा आमचा निर्णय झाला आहे. फडणवीस सरकारच्या काळात याबाबतचा कायदा मांडला गेला; तेव्हाच मी याला विरोध केला होता.थेट निवडीमुळे सरपंच एका विचाराचा आणि सदस्य दुसऱ्या विचाराचे असे चित्र अनेकदा पाहायला मिळाले. त्यामुळे निर्णयच होईना, ठराव होत नाहीत, गावचा विकास थांबला. त्यातच काही ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवक मिळाले की ग्रामपंचायत सदस्यांना विचारेनासे झाले होते. मनमानी कारभारच सुरू झाला. यामुळे ही पद्धत बदलावी, असा आमचा निर्णय झाला आहे. तसा कायदा लवकरच केला जाईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
>दफनभूमीचे वाद मिटवू
नवाब मलिक यांनी सर्व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. गावागावांमध्ये दफन भूमीच्या जागेवरून जे वाद सुरु आहेत, ते मिटविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील, असे ममत्री नवाब मलिक म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमुळे लोकांमध्ये एकप्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे. ही आघाडी पाच वर्षे टीकेल का, असा प्रश्न केला जातो. पाच वर्षे नव्हे तर २५ वर्षे ही आघाडी चालेल, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एक अधिक एक, अकरा होतात; कधी दोन होतात असे गणित देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. पण या दोन्हीत शून्य आले तर १०१ ही होतात, अशी कोटी मलिक यांनी केली.
>पितृतुल्य विजय दर्डा !
यशोमती ठाकूर यांचे स्वागत लोकमतचे सहव्यवस्थापकीय
आणि संपादकीय संचालक ॠषी दर्डा यांनी केले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी त्यांना मिळालेली शाल आग्रहाने लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्या खांद्यावर घातली. तेंव्हा उपस्थितांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली. तर, विजय दर्डा यांनी तितक्याच सहजतेने ही शाल उतरवत यशोमती ठाकूरांकडे सुपुर्द केली तेंव्हा सभागृह टाळ्यांनी भरून गेले. ठाकूर यांनी भाषणात विजय काका हे पितृत्युल्य आहेत. विजय काकांना भेटल्यावर वडीलांची छाया आपल्या पाठीशी आहे, असे वाटते. मंत्री झाले असले तरी त्यांची ही वडीलकीची छाया मला कायमच सोबत लागेल, अशा भावना व्यक्त केल्या.
>ग्रामविकासासाठी कार्यरत
असलेल्या प्रत्येकाचा सन्मान
या पुरस्कारांमागची भूमिका लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी स्पष्ट केली. गावांचा विकास करणाºया सरपंचांचा आम्ही गौरव करत आहोत; याचा आम्हाला आनंद आहे.
लोकप्रतिनिधींनी सन्मानित करण्याबाबत आमची जेव्हा चर्चा सुरु होती, तेव्हा खासदार आणि आमदार यांच्या सन्मानाचा विषय निघाला. त्याचवेळी लोकमतचे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ॠषी दर्डा यांनी सरपंचांच्या सन्मानाचा प्रस्ताव मांडला. त्यातून हा सोहळा सुरु झाला.
‘लोकमत’ने ग्रामविकासासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. गावाचा विकास होत नाही तोवर देशाचा विकास होत नाही, असे दर्डा यांनी सांगितले.
>सरपंच म्हणजे कोहिनूर हिरा
महाराष्ट्रातील सरपंच म्हणजे कोहिनुर हिरा आहेत. गावचा सरपंच जे काम करू शकतो, ते काम मुख्यमंत्रीही करू शकत नाही.
गावांनी वृक्षलागवडीच्या कामात भरीव योगदान दिले असून, चांगले काम झाले आहे. सर्वच सरपंचांनी चांगले काम करावे. आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहोत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Web Title: Government is trying to strengthen village system: Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.