सरकारकडून सुविधा देऊ, पण अपघात कमी झाले पाहिजेत - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:18 AM2020-01-14T02:18:07+5:302020-01-14T02:18:29+5:30

ज्या चालकांनी विनाअपघात २५वर्षे सेवा केली त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Government should provide facilities, but accidents should be reduced - Uddhav Thackeray | सरकारकडून सुविधा देऊ, पण अपघात कमी झाले पाहिजेत - उद्धव ठाकरे

सरकारकडून सुविधा देऊ, पण अपघात कमी झाले पाहिजेत - उद्धव ठाकरे

Next

मुंबई : सन २००५ साली चीनचे अपघाताचे प्रमाण ९४ हजार आणि भारताचे ९८ हजार होते. चीनचे आता ४५ हजारांवर आहे, तर भारताचे १.५० लाखांवर आहे. ते प्रमाण कमी व्हायला हवे. यासाठी सरकारकडून ज्या सुविधा किंवा यंत्रणा हव्या असतील त्या देऊ, अपघाताचे प्रमाण शून्यावर आणणे शक्य नाही, पण ते कमी व्हावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट येथे परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३१वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह २०२०चे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यात ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशीष कुमार सिंह, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) मधुकर पांडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, वाहतुकीचे नियम शाळा, महाविद्यालय स्तरावर मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मुलांना नियम समजल्यानंतर ते आपल्या कुटुंबीयांना समजावून सांगतात. त्यासाठी मुलांना सुरक्षिततेचे नियम सांगणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस जरी दिसत नसले तरी पोलिसांचे लक्ष आपल्यावर असते. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपली सुरक्षा ही कुटुंबाची सुरक्षा समजून शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवावा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

तर परिवहन मंत्री म्हणाले, गेल्या वर्षभरात १२,५५६ लोकांचा केवळ रस्ते अपघातात मृत्यू होणे हा आकडा छोटा नाही. याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रमांतून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रसार माध्यम, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करून पुढील वर्षभरात शून्य टक्के अपघाताची उद्दिष्टे समोर ठेवून सर्वांनी कार्य करावे.

राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, आपण वाहन चालवत असताना वाहनाची गती वाढवू नये. वाहतूक नियमांचे पालन करावे. नगरविकास विभागाकडून विकास नियंत्रण नियमावली तयार करताना परिवहन विभागाचा समावेश करून विकास आराखडा तयार करावा. ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेवर अधिक लक्ष द्यावे. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगड, वाशिम, ठाणे या जिल्ह्याच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा सत्कार करण्यात आला.

तसेच ज्या चालकांनी विनाअपघात २५वर्षे सेवा केली त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच मुंबईत अपघातामध्ये मोलाची मदत करून जीव वाचविणारे वाहतूक पोलीस अतुल अहिरे, शेखर हेडगे, लक्ष्मण गुजर, राजेंद्र टोंगारे, सागर कोळेकर यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेचे चालक जयवंत जोशी आणि पंढरीनाथ भोईर यांचा २६ वर्षे विनाअपघात सेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी काम करत राहणार असल्याची माहिती चालक प्रशिक्षक यशवंत घायवट यांनी दिली.

तीन चालकांचे सरकार चालते ते महत्त्वाचे
आमच्यावर तीन चाकांचे सरकार असल्याची टीका करण्यात आली आहे. पण दोन चाकी असो किंवा तीन चाकी समतोल साधता आला पाहिजे. अन्यथा काही चार चाकी असूनही त्यांना समतोल साधता येत नाही. त्यामुळे तीन चालकांचे सरकार आहे, पण चालते ते महत्त्वाचे आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Government should provide facilities, but accidents should be reduced - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.