Join us  

गोरेगाव पत्राचाळ : विकासकाला दणका; रहिवाशांना दिलासा, आता म्हाडाच विकासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 5:15 AM

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकासात आता म्हाडा प्राधिकरणाने कारवाई केली आहे. या प्रकरणात म्हाडा प्राधिकरणाने पत्राचाळ पुनर्विकासाचा भूखंड गुरुवारी ताब्यात घेतला. म्हाडाच्या या कारवाईमुळे ‘गुरुआशिष’ विकासकाला दणका बसला असून, म्हाडाच्या कारवाईनंतर पुढील प्रक्रिया काय होणार, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकासात आता म्हाडा प्राधिकरणाने कारवाई केली आहे. या प्रकरणात म्हाडा प्राधिकरणाने पत्राचाळ पुनर्विकासाचा भूखंड गुरुवारी ताब्यात घेतला. म्हाडाच्या या कारवाईमुळे ‘गुरुआशिष’ विकासकाला दणका बसला असून, म्हाडाच्या कारवाईनंतर पुढील प्रक्रिया काय होणार, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.प्रीमियमपासून हाउसिंग स्टॉकच्या मुद्द्यांवर म्हाडा व विकासकांमध्ये खटके उडत असतात. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रक्रियेत गोंधळ माजला असतानाच लॉटरीमधील विजेतेही घरांच्या प्रतीक्षेत होते. मात्र गुरुवारी म्हाडाने भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई केल्याने पुढील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २००६ साली पत्राचाळ पुनर्विकासाची जबाबदारी ‘गुरुआशिष’ विकासकावर सोपविली होती. विकासकाने २००८ साली पुनर्विकासाच्या कामाला सुरुवातही केली. २०११ साली पुनर्विकासाचे घोडे अडले व रहिवाशांचा जीव टांगणीला लागला. या प्रकरणात रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागितला होता. बैठका झाल्यानंतर हा भूखंड ताब्यात घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.पत्राचाळीचे प्रकरण लॉ ट्रिब्युनलकडे होते. परिणामी भूखंड ताब्यात घेण्याबाबत अडचणी येत होत्या. या कालावधीत येथील जागा आपल्या मालकीची असल्याचे म्हणत म्हाडाने हा प्रकल्प ताब्यात देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात म्हाडाच्या बाजूने निर्णय लागल्यानंतर ही जागा अखेर म्हाडाने ताब्यात घेतली आहे.म्हाडाकडूनच पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याची शक्यता आता असून, जर म्हाडाने या प्रकल्पात विकासकाची भूमिका घेतली तर रहिवाशांना दिलासा मिळेल.१० वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गोरेगाव सिद्धार्थनगरच्या पत्राचाळ पुनर्विकासाच्या नावाखाली गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने १ हजार ३४ कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले होते.म्हाडाचे कार्यकारी अभियंता नितीन गडकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी गुरुआशिषविरुद्ध फसवणूक , गैरव्यवहार, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे याअंतर्गत गुन्हा दाखल केला.गोरेगाव पत्राचाळीत २००८ मध्ये गुरुआशिष बिल्डरने पुनर्विकासाचा घाट घातला. म्हाडाच्या मालकीच्या ४७ एकर जागेवरील बैठ्या पत्राचाळीत ६७२ भाडेकरूंचा पुनर्विकास करून त्यांना ७६७ चौरस फुटांचे घर बांधून देण्याचे आमिष दाखवले. यासंदर्भातील पत्रव्यवहार म्हाडाच्या मुख्य कार्यालयातून करण्यात आला.

टॅग्स :म्हाडामुंबई