खुशखबर... कंटेनमेंट झोन वगळता हॉटेल्स, रिसॉर्ट्स सुरू करण्यासाठी नवी SOP जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 08:49 PM2020-09-11T20:49:33+5:302020-09-11T20:51:04+5:30

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह – यांनी राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सना पत्राद्वारे ही कार्यप्रणाली कळवली आहे.

Good news ... New SOP issued for hotels and resorts except entertainment zone | खुशखबर... कंटेनमेंट झोन वगळता हॉटेल्स, रिसॉर्ट्स सुरू करण्यासाठी नवी SOP जारी

खुशखबर... कंटेनमेंट झोन वगळता हॉटेल्स, रिसॉर्ट्स सुरू करण्यासाठी नवी SOP जारी

Next
ठळक मुद्देपर्यटन संचालनालयामार्फत त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे विविध हॉटेल असोसिएशन्स, व्यावसायिक यांच्याबरोबर वेबिनारचे आयोजन करुन कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

मुंबई - राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळावर जोडपत्र ए, बी आणि सीद्वारे ही कार्यप्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह – यांनी राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सना पत्राद्वारे ही कार्यप्रणाली कळवली आहे. कोरोना रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शासनाने निश्चित केलेल्या नियमास अनुसरुन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे. पर्यटन संचालनालयामार्फत त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे विविध हॉटेल असोसिएशन्स, व्यावसायिक यांच्याबरोबर वेबिनारचे आयोजन करुन कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत शासनाने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचा अंतर्भाव पर्यटन संचालनालयाने जारी केलेल्या एसओपीमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, डब्ल्युएचओ, यूएनडब्ल्युटीओ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेनुसार ही एसओपी तयार करण्यात आली आहे.

एसओपीमध्ये विविध मार्गदर्शक बाबींचा समावेश

हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांनी सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गन आदींसारख्या साहित्यामार्फत तपासणी करावी. फक्त लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना तसेच वेटींग रुम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी संबंधित प्रवाशाची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधित प्रवाशाची नाहरकत घेण्यात यावी. प्रवाशांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व आवश्यक ठिकाणी हॅन्ड सॅनिटायजर ठेवण्यात यावा. चलनाची हाताळणी करताना योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि डिजिटल माध्यमातून चलनाची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे.

हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करण्यात यावी. पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-ईन करण्यापुर्वी शक्यतो ऑनलाईन भरुन घेण्यात यावा. शक्य असल्यास क्यू आर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-ईनसारख्या बाबी सुरु कराव्यात. अभ्यागतांनी काय करावे आणि काय करु नये (डूज आणि डोन्टस्) संदर्भातील माहिती त्यांना बूकलेट किंवा व्हीडीओच्या स्वरुपात देण्यात यावी. अभ्यागतांनी शक्य असल्यास त्यांच्या सामानाची स्वत: ने-आण करावी. एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास अभ्यागतांचा समोरासमोर संपर्क टाळण्याच्या दृष्टीने वर जाणे आणि् खाली येण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करण्यात यावा. रुम सर्व्हीस संपर्करहित असावी. अभ्यागताने मागवलेली ऑर्डर रुमच्या बाहेर ठेवण्यात यावी. मुलांसाठीचे प्ले एरिया बंद राहतील. याशिवाय इतरही विविध मार्गदर्शक बाबींचा एसओपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

याच पद्धतीने होम-स्टे, बी अँड बी, फार्म-स्टे आदींसाठीही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी एमटीडीसीच्या https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 

Web Title: Good news ... New SOP issued for hotels and resorts except entertainment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.