मुंबई : अहमदनगर येथील कसाईवाडा परिसरातून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री होत असल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी जप्त केलेल्या मांसाच्या अहवालातून उघड झाली. या प्रकरणी कुर्ला येथील खाटिक हुसेन गुलाम कुरेशीला शुक्रवारी विक्रोळी पोलिसांनी गजाआड केले. कुर्ला येथील रहिवासी असलेला कुरेशी हा खाटिक गेल्या महिन्याभरापासून कुर्ला परिसरात गोमांस विक्री करीत होता. १६० ते १८० रुपये किलो दराने हे गोमांस विकले जात असल्याचे तपासात समोर आले. २ आॅगस्ट रोजी याची माहिती करुणा परिवार प्राणिमित्र संघटनेचे भाविन चंद्रकांत गठाणी यांना मिळाली. त्यांनी आरोपींचा पाठलाग करून आरोपी चौकडीकडून जवळपास अडीच हजार किलो गायीचे आणि वासराचे मांस जप्त केले. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत मोहम्मद युनूस कुरेशी (३६), अख्तर शेख अजगर शेख (२४), खान मोहम्मद जाफर (३०), साजीद कुरेशी (३३) या आरोपींना अटक केली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मांस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालानुसार हे गोमांस असल्याचे सिद्ध झाले. गोमांसविक्री होत असल्याची ही पहिलीच कारवाई आहे. त्यानुसार शुक्रवारी विक्रोळी पोलिसांनी कुरेशीच्याही मुसक्या आवळल्या. त्याने दिलेल्या माहितीत भिवंडीसह मुंबईच्या विविध ठिकाणी आजही गोमांसची विक्री होत असल्याचे समोर आले. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
मुंबईमध्ये गोमांसाची विक्री सुरूच खाटिकाला अटक
By admin | Updated: August 22, 2015 01:02 IST