Join us  

निकालपत्रिकांसह शिक्षक द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:22 AM

विद्यार्थी आंदोलनाचे केंद्रस्थान झालेले मुंबई विद्यापीठाचे फोर्ट कॅम्पस दीक्षान्त समारंभादिनीही अशांत होते. दीक्षान्त समारंभाच्या सुरुवातीपासून समारोपापर्यंत इतिहासात प्रथमच विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मूक निदर्शने सुरू

मुंबई : विद्यार्थी आंदोलनाचे केंद्रस्थान झालेले मुंबई विद्यापीठाचे फोर्ट कॅम्पस दीक्षान्त समारंभादिनीही अशांत होते. दीक्षान्त समारंभाच्या सुरुवातीपासून समारोपापर्यंत इतिहासात प्रथमच विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मूक निदर्शने सुरू असल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. गेल्या तीन सत्रांची निकालपत्रिका आणि चौथ्या सत्रासाठी शिक्षक द्या, या मागणीसाठी राजीव गांधी समकालीन केंद्रातील सामाजिक कार्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी तोंडावर रुमाल बांधत ठिय्या दिला.दरम्यान, विद्यापीठाच्या विविध अधिकाºयांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र कुलगुरूंच्या भेटीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. याआधी वारंवार कुलगुरू, शिक्षणमंत्री आणि राज्यपालांना निवेदने दिली. मात्र कोणीही तोडगा काढू शकले नाहीत, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे कुलगुरू भेट देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.ठरल्याप्रमाणे तोंडाला रुमाल बांधत कडक उन्हात सर्व विद्यार्थी दीक्षान्त समारंभ संपेपर्यंत रस्त्यातच बसून होते. अखेर अधिकाºयांनी रजिस्ट्रारची भेट करून देत विद्यार्थ्यांची समजूत काढली.मात्र रजिस्ट्रार यांनीही कोणतेही लेखी आश्वासन दिले नसल्याने नाराजीच्या सुरातच विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तर या प्रकरणी २० फेब्रुवारी रोजी तीन सहायक प्राध्यापकांची नियुक्ती केल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बन्सोड यांनी दिली. केंद्राच्या समन्वयक पदासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत. विद्यार्थ्यांना लवकरच गुणपत्रिका देणार असल्याचेही बन्सोड यांनी स्पष्ट केले आहे.