Join us  

सर्पदंश झाल्यावर मोफत उपचार द्या- निशिगंधा नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:29 AM

१२१ व्या वर्षात हाफकिन संस्थेचे पदार्पण

मुबंई : वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यावर शासनाकडून मोफत उपचार केले जातात. परंतु सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर मोफत उपचार केले जात नाहीत़ सर्पदंशावरही मोफत उपचार मिळावेत, अशी मागणी हाफकिनच्या १२१ व्या स्थापना दिनानिमित्त हाफकिन संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी केली. परळ येथील हाफकिन संशोधन संस्था ही १० आॅगस्ट रोजी १२१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.निशिगंधा नाईक म्हणाल्या की, नव्या वर्षामध्ये सर्पालयाचे नूतनीकरण, राष्ट्रीय विष संशोधन केंद्राची स्थापना, बायो इन्क्यूबेटर (नवे संशोधक, अभ्यासक, तज्ज्ञ) यांना उत्पादनाच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी संस्था मदत करणार आहे. तसेच हाफकिनमधले म्युझियम मोठ्या स्तरावर नेण्याचा संस्थेचा मानस आहे. ही कामे येत्या वर्षात केली जाणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसोबत फेबु्रवारी २०१९ मध्ये बैठक झाली. बैठकीदरम्यान येत्या २०२२ वर्षापर्यंत सर्पदंशाचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याकडे पावले उचलली जाणार आहेत. सर्पदंशाची लस हा एकमेव सर्पदंशावरील उपाय आहे. भारतात ही लस पहिल्यांदा हाफकिन संस्थेने तयार केली ते आजतागायत काम सुरू आहे. लस तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत खर्चीक असल्यामुळे काही खासगी कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे जगभरात सर्पदंशाच्या लसीचा तुटवडा आहे. यासाठी शासकीय स्तरावरून काही तरी उपाययोजना करून सर्पदंश झालेल्या नागरिकांना मोफत सेवा पुरविली पाहिजे.डिपार्टमेंट आॅफ हेल्थ रिसर्च गव्हर्नमेंट आॅफ इंडिया यांच्याकडे संस्थेने एक प्रकल्प देण्यात आला. तो प्रकल्प मान्य होऊन त्याच्या अंतर्गत सहा वर्षांसाठी सव्वाचोवीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत सापांच्या विषात जी भिन्नता असते ती नेमकी काय आहे, हे शोधून काढण्याचे काम केले जाईल. ज्या लसी तयार करतात त्या लसीमुळे कोणकोणत्या ठिकाणच्या विषावरती उपाय होऊ शकतो हेही बघणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी एका संस्थेकडून निधी मिळाला असून त्याचा वापर सापाचे विष आणि लस यांचे परीक्षण करण्यासाठी एक प्रयोगशाळा उभारण्यासाठी केला जाणार आहे. सध्या प्रयोगशाळेचे काम सुरू आहे, असे भाष्य निशिगंधा नाईक यांनी केले.उद्या १२० वा स्थापना दिन१० आॅगस्ट रोजी हाफकिन संस्थेला १२० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम परळ येथील हाफकिन संशोधन संस्थेमध्ये सकाळी १० वाजता सुरू होईल. या वेळी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च इन रिप्रोक्टरी हेल्थचे माजी संचालक ‘बायो डायव्हर्सिटी इन वेस्टर्न घाट’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट केमोथेरेपी विभागाचे प्रमुख डॉ. रामाक्रिष्णा आंबेय ‘कर्करोगावर वनस्पतीमधून औषधजन्य घटक शोधणे’ यावर माहिती देणार आहे. दरम्यान, वृक्षारोपण या थीमवर रांगोळी व स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.