Join us  

मुंबईतील जुन्या इमारती बनताहेत अवैध ‘गर्ल्स हॉस्टेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 4:48 AM

शिक्षण तसेच भवितव्य घडविण्यासाठी तरुणांबरोबरच लाखो तरुणींची पावले मायानगरी असलेल्या मुंबईकडे वळतात. मात्र राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो.

मनीषा म्हात्रे मुंबई : शिक्षण तसेच भवितव्य घडविण्यासाठी तरुणांबरोबरच लाखो तरुणींची पावले मायानगरी असलेल्या मुंबईकडे वळतात. मात्र राहायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. मुंबईत वसतिगृहांची बोंब आहे, अशा वेळी नाइलाजाने खासगी ठिकाणांचा आसरा घ्यावा लागतो. याचाच फायदा घेत मुंबईतील अनेक जुन्या इमारतींत अवैध गर्ल्स हॉस्टेलचा धंदा सुरू आहे. यातूनच लाखोंची कमाई होत असल्याची माहिती ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून उघड झाली.मुंबईत तरुणी येतात, कामावर, कॉलेजमध्ये जातात. त्या मुंबईत कशा राहतात, याचा शोध घेतला. कॉलेज, कॉर्पोरेट कार्यालयाखालील पानटपरी, चहावाल्यांकडून या मुलींना मुंबईतील प्रशस्त गर्ल्स हॉस्टेलची माहिती मिळत असल्याचे दिसले. काही मुलींसोबत संवाद साधला. त्यांच्याकडून अवैध गर्ल्स हॉस्टेलची माहिती समोर आली.मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सीएसटी, दादर, घाटकोपर, मुलुंड, चर्चगेट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव, गोरेगावसारख्या जुन्या इमारतीत काहींनी घर, तर काहींनी टेरेसमध्ये गर्ल्स हॉस्टेल बनविले आहे. गेल्या वर्षी ठाण्याच्या उपवन येथील सत्यम लॉजच्या मालकाने जमिनीखाली तीन मजली तळघर तयार करत २९० खोल्यांचे बांधकाम केले होते. त्यावरील कारवाईही चर्चेत आली. या गर्ल्स हॉस्टेलचा बाहेरचा परिसर अगदी साधा वाटत असला तरी आतमधील चित्र काही निराळेच आहे. यामध्ये स्थानिक गुंड, राजकीय नेते तसेच काही पोलिसांनीही अनधिकृतपणे असे गर्ल्स हॉस्टेल सुरू केल्याचे दिसून आले. अवघ्या ८ बाय ८ च्या खोलीसाठी त्यांना महिना १३ ते २५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. एका ठिकाणी १२ ते १८ खोल्या उभारण्यात येत आहेत. त्यामुळे महिन्याला ही मंडळी दोन ते अडीच लाख रुपयांची कमाई करत आहेत.याचाच शोध घेत असताना पालिका, पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरील जमुना या पागडी इमारतीतील अवैध गर्ल्स हॉस्टेलची माहिती मिळाली. महिना १३ हजार भाडे आकारण्यात येते. गर्ल्स हॉस्टेलमुळे सुरू असलेल्या कमाईच्या पडद्याआड या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.अवैध गर्ल्स हॉस्टेलचा शोध घेत असताना पालिका, पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जमुना या पागडी इमारतीतील अवैध गर्ल्स हॉस्टेलची माहिती हाती लागली. इमारतीच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये भयाण वास्तव उघडकीस आले. गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी हे गर्ल्स हॉस्टेल सुरू आहे. तब्बल १८ खोल्या या ठिकाणी बनविण्यात आल्या आहेत.