Join us  

घाटकोपर - विद्याविहारची वाहतूक कोंडी लवकरच फुटणार

By रतींद्र नाईक | Published: May 27, 2023 8:56 PM

विद्याविहार उड्डाणपुलासाठी पालिका मध्यरात्री गर्डर बसवणार; रेल्वे घेणार तीन तासाचा मेगा ब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:घाटकोपर व विद्याविहारच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. एलबीएस मार्ग व रामकृष्ण चेंबूरकर मार्ग यांना जोडणाऱ्या विद्याविहार पुलाचा ९९.३० मीटर लांब गर्डर शनिवारी मध्यरात्री बसवला जाणार असून पालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. हा गर्डर बसविण्यासाठी मध्य रेल्वे ३ तास मेगा ब्लॉक घेणार आहे.

विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल असून तो जीर्ण झाला आहे. त्यामुळे पालिका त्याठिकाणी नव्याने पूल बांधणार आहे. या पुलाचा आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. २०२२ मध्ये बांधून हा पूल तयार होणार होता मात्र रेल्वे मंत्रालयाच्या संशोधन डिझाइन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) पुलामध्ये बदल सुचवल्यामुळे रेल्वे क्षेत्रातील आराखड्यात बदल करावा लागला. त्याच बरोबर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम भागातही बदल करावे लागले  याशिवाय कोविडमध्ये पुलाचे काम थांबवण्यात आले त्यामुळे अपेक्षित कालावधीत बांधकाम होऊ शकले नाही आता पुलाच्या कामाला गती मिळाली असून शनिवारी मध्य रात्री १.१० ते ४.२० या कालावधीत गर्डर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच काही दिवसात हा पूल बांधून पूर्ण होणार आहे. अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

असे केले जाणार काम

कल्याणच्या पत्रीपुलाप्रमाणेच या पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. पूर्व आणि पश्चिमेला थेट जोडणारा हा पूल असेल. यात एकही खांब नसेल. पुलावर ९९.३० मीटर लांबीचे दोन गर्डर बसवण्यात येणार आहे. पहिला गर्डर बसवण्यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागणार असून, त्यासाठी पालिकेने मध्य रेल्वेकडे प्रस्ताव पाठवला आहे. पहिल्या गर्डरनंतर दुसरा गर्डर बसवण्याचे काम सहा महिन्यांत मार्गी लावण्यात येईल. रेल्वे रुळाच्या भागावरील पुलाची रुंदी २४.३० मीटर असून पुलाच्या दोन्ही बाजूला पादचाऱ्यांना चालण्यासाठी फूटपाथ बांधण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईघाटकोपर