Join us  

न्याय मिळेना ! सेवानिवृत्त सैनिकाची जमिनीसाठी वाताहत, ५० वर्षांपासून शासन दरबारी खेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:51 AM

१९६५ सालच्या पाकिस्तानविरोधातील युद्धात लढलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची शासनानेच मंजूर केलेल्या जमिनीसाठी वाताहत सुरू आहे.

मुंबई : १९६५ सालच्या पाकिस्तानविरोधातील युद्धात लढलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची शासनानेच मंजूर केलेल्या जमिनीसाठी वाताहत सुरू आहे. सेवानिवृत्त सैनिक चंद्रशेखर मल्लिकार्जुन जंगम यांना शासनाकडून १९६८ रोजी सातारा येथील रविवारमध्ये जमीन मंजूर झाली होती. मात्र, अद्याप तिचा ताबा मिळाला नसल्याने जंगम यांना शासनाच्या लाल फितीविरोधात लढा द्यावा लागत आहे.जंगम यांच्या मुलाने मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा धक्कादायक खुलासा केलेला आहे. शरीराने थकलेल्या जंगम यांची महसूल विभागासोबत लढाई सुरू आहे. गेल्या ५० वर्षांपासून शासनाच्या दरबारी जंगम खेटे घालत आहेत. पाठपुरावा करूनही त्यांना जमिनीचा ताबा मिळालेला नाही. माहिती अधिकारात जंगम यांच्या हाती आणखी धक्कादायक माहिती लागली आहे. जंगम यांना शासनाने मंजूर केलेल्या जमिनीपैकी एक भूखंड एका महिलेच्या नावावर हस्तांतरित झाला असून उरलेल्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे.त्यामुळे संबंधित जागा खाली करून देण्यात यावी किंवा प्रशासनाने सातारा येथेच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन जंगम यांच्या मुलाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना केले आहे. १ मेपर्यंत या मागणीची दखल घेतली नाही, तर महाराष्ट्र दिन आणि वडिलांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जंगम यांच्या मुलाने दिला आहे.

टॅग्स :भारतीय जवान