Join us  

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:02 AM

भरदिवसा फ्लॅट, बंद दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाºया सराईत टोळीचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाला यश आले आहे.

मुंबई : भरदिवसा फ्लॅट, बंद दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाºया सराईत टोळीचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाला यश आले आहे. त्यांनी कांजूरमार्ग परिसरात दोघा भावांसह तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुंबई व परिसरातील घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.ज्ञानशेखर आप्पादुराई शेट्टी (वय ३७, रा दिवा, ठाणे), मोहन आरमुगम शेट्टी (२७, रा. कांजूरमार्ग) व त्याचा भाऊ लोकनाथ उर्फ आरमुगम (२३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वॉचमन व सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या अपार्टमेंट, बिल्डिंगमध्ये ते सेल्समन असल्याचे सांगून जात, कटावणी व स्क्रू डायव्हरच्या साहाय्याने फ्लॅटचे दरवाजे उचकटून घरफोडी करीत असल्याचे विभागाचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.मालमत्ता कक्षातील प्रभारी सतीश मयेकर, साहाय्यक निरीक्षक सुनील माने यांना विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड कांजूरमार्ग परिसरात घरफोडी करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बुधवारी परिसरात सापळा रचला. संशयास्पदरीत्या आढळून आलेल्या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे कटावणी, स्क्रू ड्रायव्हर व अन्य साहित्य मिळून आले. चौकशीमध्ये त्यांनी शिवाजी पार्क व माहिम परिसरातील फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक फ्लॅट फोडून ७० सोने तोळे व रोकड लंपास केली होती.या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस या टोळीचा कसून तपास करत होते. त्यानंतर चौकशीअंती त्यांना ताब्यात घेण्यात आले. यातील ज्ञानेश्वर शेट्टी याच्याविरुद्ध मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी घरफोडी, दरोडा, जबरी चोरी आदीचे ३५ गुन्हे दाखल आहेत. मोहन शेट्टीवर १६ तर त्याचा भाऊ लोकनाथ यांच्यावर १२ गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.